पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
इस्लाम आणि संस्कृति


करता कामा नये. आपण दानशूर आहोत अशी आपली जाहिरात व्हावी या हेतूनें कांही लोक दानधर्म करतात; पण हा मार्ग इस्लाम धर्मांत · अपवित्र' समजण्यांत येतो. कोणालाही न समजतां केलेले गुप्त दान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे समजले जाते.
 ज्यांच्याजवळ संपत्ति नाही, त्यांनाही पण दानधर्म करतां येतो. एकाद्या गरीब माणसाने सत्कार्य केले तर त्या सत्कार्याची गणना दानधर्मांत केली जाते. दलितांची सेवा करणे, लोकांना सन्मार्गावर आणण्याकरितां उपदेश करणे, चुकलेल्या वाटसरूंस वाट दाखविणे, तहानेलेल्यास पाणी देणे, अशक्त किंवा वृद्ध लोकांचा बोजा उचलणे, मूक प्राण्यांना दयाळूपणाने वागविणे, शोकग्रस्तांचे सांत्वन करणे, लहान मुलें व पत्नी यांजबरोबर ममतेने वागणे, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी प्रेमाने बोलणे या सर्व गोष्टी सत्कृत्यांत जमा होतात. ही सत्कृत्ये, म्हणजे दानधर्मच होय असें इस्लामधर्म समजतो.

मक्केची यात्रा


 ' मक्केची यात्रा' हे पांचवें तत्त्व होय. ज्यांना शक्य आहे त्यांनी मक्केची यात्रा केलीच पाहिजे असा दंडक आहे. ही महान यात्रा करणाऱ्यास पुढील गोष्टी आचराव्या लागतात. (१) आपले सर्व कर्ज फेडून, आपल्या मुलाबाळांची व कुटुंबियांची तरतूद करून ठेविली पाहिजे. (२) प्रवासास आवश्यक असणाऱ्या वाहनाची व अन्नपाण्याची व्यवस्था करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असले पाहिजे.. (३) त्याने आपल्या प्रवासाच्या शक्याशक्थतेचा विचार केला पाहिजे. (४) त्याने आपल्या शत्रंना मोकळ्या अंत:करणानें क्षमा केली पाहिजे. (५) त्याने एकाद्याचा गुन्हा केला असेल तर तो