पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

४५


त्याचा कांही एक उपयोग न होता, त्यांच्यापैकी काहींनी उपवास न सोडतां मरण पत्करले. तेथून ताबडतोब ती बोट इंग्लंडला परत फिरविल्यामुळेच बाकीच्या सैनिकांचे प्राण वाचले."*

दानधर्म


 प्रत्येक मुस्लिमानें दानधर्म (जकात.) केलाच पाहिजे असें बंधन आहे. आपल्या उत्पन्नाचा ४० वा भाग त्याने गोरगरीब, गरजू , अपंग व अनाथ यांना दान म्हणून दिला पाहिजे. त्याच्याजवळ १०० रुपये असतील तर वरील हिशेबाने अडीच रुपये त्याने दानधर्माकरितां बाजूला काढून ठेवलेच पाहिजेत. दानधर्म न करतां संपत्तीचा संचय करणारा गृहस्थ हीन मानला जातो. आपली संपत्ति ही केवळ आपल्या चैनीकरितांच आहे असें न समजतां, आपल्या संपत्तीमध्ये गोरगरिबांचा हक्काचा हिस्सा आहे असें प्रत्येक मुस्लिमानें समजावे म्हणूनच दानधर्माचे तत्त्व इस्लाम धर्मांत समाविष्ट केलें आहे. नमाजइतकेंच पुण्य दानधर्मांत आहे हे प्रत्येक मुस्लिमानें ओळखले पाहिजे. गोरगरिबांखेरीज जे कर्जबाजारी असतील, पैशाच्या अडचणीत असतील त्यांना मदत करणे किंवा जे गुलाम असतील स्थांचे स्वातंत्र्य - खरेदी करण्याकरितां पैसे खर्चणे या गोष्टींचा इस्लाम धर्मानें दानधर्मांत अंतर्भाव केला आहे.

 दानधर्म करतांना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. दानधर्म करणाराने आपण दुसऱ्यावर उपकार करीत आहोत असें समजतां कामा नये; त्याने गरजूला तुच्छतेने न वागवितां प्रेमाने वागविले पाहिजे त्याने उपकृत माणसापासून कृतज्ञतेची अपेक्षा


* Islamic Faith, Page 36.