पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
इस्लाम आणि संस्कृति


 मुस्लिम धर्मातील उपवास म्हणजे नुसते अन्नपाण्यावांचन उपाशी राहणे नसून दुष्ट व पापी वृत्तीपासून अलिप्त राहणे होय. त्या काळांत सदाचार व सद्विचार यांचा अवलंब करून आपला वेळ ईशचिंतनांत घालवावा लागतो. सूर्यास्तानंतर उपवास सोडल्यास थोडा वेळ विश्रांति घेऊन पुन्हां रात्री ९ वाजतां मशिदीत जाऊन प्रार्थना करावी लागते. या प्रार्थनेस ' तरावीह ' म्हणतात. त्या वेळी पवित्र कुराणचे पठण होत असते. एक महिनाभर उपवास केल्यानंतर शेवटी · ईदुल फित्र ' ( रमजान ईद) साजरी करण्यांत येऊन दानधर्म मोठया प्रमाणांत केला जातो. ईदचा दिवस अत्यंत आनंदांत घालविण्यांत येतो. ईदनंतर आणखी सहा दिवस. उपवास करावयाचा असतो; पण हा उपवास केलाच पाहिजे असें बंधन नाही. आजारी, प्रवासी व गर्भवती स्त्रिया यांनी रमजानचे उपवास केले पाहिजेत अशी सक्ति नाही; पण उपवासाऐवजी त्यांनी गोरगरिबांना अन्नदान करावे अशी आज्ञा आहे.

 उपवासाचा रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. जगातील सर्व भागांमध्ये, मुस्लिमांकडून हा महिना मोठया निष्ठेनें व भक्तिभावाने पाळला जातो. उपवासाची ईश्वरी आज्ञा मुस्लिम केवढ्या निष्ठेने पाळतात याचे वर्णन सर थॉमस अर्नोल्ड यांनी आपल्या ग्रंथांत केले आहे. ते म्हणतात, “इ. स. १९२८ साली उत्तर ध्रुवाकडे जाणाऱ्या एका ब्रिटिश बोटींत मुस्लिम सैनिक होते. त्या प्रदेशांत सूर्यास्त होत नाही हे श्रुत आहेच. त्या वेळी रमजानचा महिना सुरू होता; अर्थात् सूर्यास्त झाल्यावर उपवास सोडूं, या कल्पनेने ते मुस्लिम सूर्यास्ताची वाट पाहू लागले. उपवास सोडून त्यांनी अन्नग्रहण करावे असे त्यांना परोपरीने सांगण्यांत आले पण