पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

३७


सहवासांत असणाऱ्या खास व अधिकारी व्यक्तींकडून हीं बोधवचनें गोळा करण्यांत आली आहेत. त्या व्यक्तींकडून आपण जे सांगतों तें सत्य आहे अशी शपथ घेऊन नंतर त्या व्यक्तीने कथन केलेली हजरत पैगंबरांची वचनें विचारांत घेण्यांत येत. त्यानंतर ती वचनें हजरत पैगंबरांचीच आहेत याविषयी कसून चौकशी केल्यानंतरच त्यांचे संकलन करण्यांत येई. अल बुखारी, इमाम मुस्लिम, अबू इसा तिरमिझी, अबू दाऊद, अबू अबदुर रहिमान आणि अबू अब्दुल्ला इब्न माजा या सहा विद्वान् व सदाचरणी मुस्लिम महाभागांनी एकत्रित केलेली वचने अधिकृत मानली जातात. या-1 खेरीज इमाम शाफी, इब्ने हंबल, इमाम मालिक यांचेही संकलन तितक्याच योग्यतेचे मानले जाते.

 पवित्र कुराण व हदीस नंतर आणखी दोन तत्त्वांवर' इस्लाम आधारला आहे. ती तत्वे म्हणजे 'इज्मा ' व ' कयास' ही होत. इज्मा याचा अर्थ मतैक्य असा होतो. " माझ्या अनुयायांचे चुकीच्या मार्गावर कधीही एकमत होणार नाही." या हजरत पैगंबरांच्या वचनामुळेच 'इज्मा' नांवाची निष्पत्ति झाली आहे. आपल्या अनुयायांचें ज्या गोष्टीवर एकमत होहेल तीच गोष्ट योग्य समजावी हाच अर्थ हजरत पैगंबरांच्या वरील वाक्यावरून निघत असल्यामुळे मतैक्यास किंवा ' इज्मा'च्या विशाल तत्त्वास इस्लाम धर्मांत फार मोठे स्थान आहे. या तत्त्वामुळे निरनिराळ्या काळास पोषक होणारी मतप्रणाली व कायदे यांना इस्लाम धर्मात स्थान मिळाले आहे. नव्या परिस्थितीस सुसंगत व अनुरूप असें नवें जीवन कंठण्यास मुस्लिमांना या तत्त्वाने मार्ग खुला करून दिला आहे. बदलती परिस्थिति व इस्लाम यांचा संघर्ष कोठेही होत नाही याचे कारण तरी हेच होय.