पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
इस्लाम आणि संस्कृति



मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी हजरत पैगंबरांचा खून करण्याचा बेत रहित केला आणि ताबडतोब स्वतः इस्लाम धर्माची दीक्षा घेतली.
 पवित्र कुराणमधील भाषा जितकी परिणामकारक तितके त्यामधील विचार उदात्त आहेत. सत्य व सदाचाराकडे आवाहन करतांना, मानवतेचा पुरस्कार करतांना तर त्या उदात्तपणाची सीमा झालेली दिसून येते. पवित्र कुराण व त्यामधील विचारसरणी यांसंबंधीं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “ कुराणचे संदेश म्हणजे ईश्वराचे औदार्यपूर्ण निश्वास आहेत. त्यांत दिव्यता ऐवजी मानव्य आहे."
 पवित्र कुराणमध्ये नुसत्या धार्मिक गोष्टींचाच अंतर्भाव केला नाही तर त्यांत ऐहिक गोष्टींचाही परामर्ष घेण्यांत आला आहे. पवित्र कुराण म्हणजे धार्मिक, सामाजिक, नैतिक व राजकीय संहिताच होय. मनुष्याला मार्गदर्शक होतील अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह त्यांमध्ये आहे. अल-बक्र, अन-निसा, अल-इमरान, अल्मयदा, अन्-नूर, बनी ईस्त्राईल या भागांमध्ये मुस्लिम कायद्याची रूपरेषा आपणांस दिसून येईल.
 पवित्र कुराणचे खालोखाल हदीसचे महत्त्व आहे. हदीस म्हणजे हजरत मुहम्मद पैगंबरांची संकलित केलेली बोधवचनें. जनतेला मार्गदर्शन करण्याकरितां हजरत पैगंबरांनी जो सदुपदेश केला किंवा जी बोधवचने सांगितली त्यांचे संकलन हदीसमध्ये केले आहे. हे संकलनकार्य पहिल्या चार खलिफांच्या कारकीर्दीमध्ये अत्यंत परिश्रमपूर्वक करण्यात आले आहे. हजरत पैगंबरांच्या निकट