पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
इस्लाम आणि संस्कृति



 कांहीं धर्मांत संन्यास धर्म किंवा विरक्तवृत्ति याची महती गाण्यांत आली आहे; पण इस्लाम धर्माने संन्यास घेण्यास सक्त मनाई केली आहे. संन्यस्त किंवा वैराग्यवृत्ति ही सर्वसाधारण माणसांना झेंपण्यासारखी नाही. सर्वसंग परित्याग करून संन्यास धर्म स्वीकारणे ही कठीण गोष्ट आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य, खंडतर तपश्चर्या यांमुळे परमार्थ मिळविता येतो अशी समजूत आहे. ही समजूत इस्लाम धर्मास पटत नाहीं; इतकेच नव्हे या गोष्टी अनैसर्गिक आहेत असें तो समजतो. एकाद्या सुंदर स्त्रीकडे पापी नजरेने पहात नाही म्हणून मी सज्जन आहे असे एकाद्या आंधळ्याने सांगितले तर त्याचा आपल्या मनावर परिणाम होणे शक्य आहे का! याच्या उलट डोळे असून त्या स्त्रीकडे एकाद्याने पापी नजरेन पाहिले नाही तर त्याच्या सज्जनपणाबद्दल आपणांस कधीच शंका येणार नाही. या जगांत राहून मोह किंवा विकार यांच्या आहारी न जातां सत्कार्य करीत राहणे हीच खरी पुण्याई व हाच खरा परमार्थ असें इस्लाम मानतो.
 मनुष्यास आचरण्यास कठीण असे धार्मिक विधी किंवा त्याला कर्जबगारी करून टाकणारी व्रतवैकल्ये यांना इस्लाममध्ये स्थान नाही. धार्मिक विधी व व्रतवैकल्यांच्या फापट पसाऱ्यांत, मनुष्य परमेश्वराला विसरून जातो. त्याला वाटते की आपण नुसते विधी, याग किंवा वैकल्ये केली म्हणजे आपली इतिकर्तव्यता संपली. या वृत्तीमुळे परमेश्वराने आपणांस ज्या गोष्टींचा आदेश दिला आहे त्या गोष्टींकडे सहजच कानाडोळा होतो; शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वृत्तीमुळे परान्नपुष्ट असा निराळाच वर्ग समाजांत निर्माण होतो. हा वर्ग 'पुरोहित वर्ग' या नांवाने साऱ्या जगास ज्ञात आहे.