पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

२९




 वरील श्लोकावर भाष्य करतांना, मौ. महंमद अली लिहितात, " ख्रिश्चन किंवा ज्यू लोकांनाच मुक्ति मिळेल अशी जी त्यांची कल्पना, तिला कोणताही आधार नाही असें ख्रिश्चन व ज्यू लोकांस बजावणेत आले आहे. परमेश्वरास संपूर्णपणे शरण जाणे आणि त्याने निर्माण केलेल्या प्राणिमात्रांचे कल्याण करणे हाच मुक्तीचा किंवा सद्गतीचा खरा मार्ग आहे आणि इस्लाम हेच शिकवितो हे पवित्र कुराणवरून सिद्ध होतें."
 इस्लामचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या पचनी पटतील अशी तत्त्वे त्या धर्मांत आहेत. धर्म हा काही विशिष्ट व्यक्तीपुरता नसून तो जनतेकरितां असतो. सर्वांना मार्गदर्शन करावयाचे श्रेष्ठ कार्य धर्माला करावयाचे असते. त्या धर्माचे आकलन व आचरण सर्वसाधारण व्यक्तीच्या शक्तीबाहेर असेल तर त्याला धर्म ही संज्ञा देणे धाष्टांचे ठरेल. धर्म किंवा धर्मातील तत्त्वे जनतेला सहज कळली पाहिजेत व ती बिनासायास आचरतां आली पाहिजेत हा दृष्टिकोन इस्लामनें आपल्या समोर ठेविला आहे. गहन तत्त्वे, गूढ विचार व माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी व्रतवैकल्ये आपणांस इस्लाम धर्मांत कधीच दिसून येणार नाहीत; त्याच्या शक्तीबाहेर असणारे एकही तत्त्व किंवा विधी आपणांस सांपडणार नाही.
 "आपल्या शक्तीबाहेर असणाऱ्या गोष्टींचा प्रयत्न करा अशी सक्ति परमेश्वर कोणावरही करीत नाही."

-पवित्र कुराण २:२८६.


 

†The Holy Quran, Pages 56.