असल्यामुळे मानव जातीचे कल्याण म्हणजेच परमेश्वराची सेवा असें तो मानू लागतो.
मानव जातीच्या सौख्याप्रीत्यर्थ चंदनासारखे झिजणारास मुक्ति किंवा सद्गति मिळते असा इस्लामचा दावा आहे. कोणत्याही माणसास अशी सद्गति मिळू शकते असा आदेश देऊन इस्लामने धार्मिक जगांत बुद्धिवादाचे नवें दालन उघडले आहे. त्या काळी मुक्ति किंवा सद्गति मिळवावयाची असेल तर आमच्या धर्मांत या असा आक्रोश चालू होता. स्वर्गाच्या किल्ल्या फक्त आपल्या धर्माच्या हाती आहेत असा डांगोरा पिटला जात होता. इस्लामने पवित्र कुराणमधून (२:१११) अशा धर्मांना उघड आव्हान देऊन विचारले की याला आधार काय? त्या त्या धर्माच्या अगोदर जगाचे अस्तित्व हजारों वर्षे आहे. त्या धर्माखेरीज सद्गति मिळणे शक्य नाही असा हटवाद मांडला तर त्या धर्माच्या अगोदर होऊन गेलेल्या असंख्य सच्छिल माणसांची किंवा इतर धर्मात असणाऱ्या सदाचारी व वंदनीय पुरुषांची वाट काय? त्यांना सद्गति किवा मुक्ति मिळणे शक्य नाही असें धर्ममार्तंडांनी टाहो फोडून सांगितले तर तें बुद्धीला कधीतरी पटेल काय? या बाबतींत इस्लामने अंधश्रद्धेपेक्षां बुद्धिवादाला आवाहन केले आहे. परमेश्वराला शरण जाणारा आणि मानवांच्या सौख्याकरितां अहर्निश धडपडणारा कोणताही मनुष्य असो त्याला सद्गति ही मिळालीच पाहिजे असा निर्णय इस्लामने दिला आहे.
-पवित्र कुराण २:११२.