पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

२५


भव्य व उत्तुंग असें उभे राहिले. धार्मिक छळाने त्रस्त झालेल्या अनेकांना हा आश्रय आकर्षक वाटल्यास नवल ते काय ? इस्लामी धर्माच्या संरक्षणाखाली जे जे आले त्या सर्वांना सदसद्विवेकबुद्धीचें संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले, किंबहुना त्रस्त व दलित यांच्या आश्रयासाठीच या नवधर्माचा अवतार झाला आहे असे सर्वांना वाटले."t

 एकेश्वरवादाने व्यक्तिश: प्रत्येक मनुष्याचा दृष्टिकोन विशाल होतो, त्याची नैतिक व सांस्कृतिक उंची वाढते. परमेश्वर हा सर्व जगाचा मालीक असल्यामुळे जगांतील यच्चयावत् मनुष्यमात्रावर प्रेम करणे हे आपले कर्तव्य आहे असें तो समजतो. आपल्याच जातीपुरते किंवा राष्ट्रापुरतें पाहण्याची त्याची कोती दृष्टि निघून जाते. त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये स्वाभिमान व निर्भयवृत्ति अधिक जोराने पालवते. परमेश्वर सर्वशक्तिमान असल्यामुळे त्याच्याखेरीज आपले या जगांत कोणी वांकडे करूं शकत नाही किंवा आपल्याला धक्का पोहोचवू शकत नाहीं या विश्वासाने परमेश्वराखेरीज तो कोणत्याही पाशवी शक्तीपुढे आपले शीर झुकवीत नाही. वाटेल तेवढी संकट कोसळली किंवा वाटेल त्या दुर्धर परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरी न डगमगतां परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून, प्रशंसनीय सहनशीलता व धैर्य तो दाखवू शकतो. इच्छित वस्तु प्राप्त करून देणे हे परमेश्वराच्या हाती असल्यामुळे तो कोणाजवळही तोंड वेंगाडत नाहीं, दुसऱ्यापुढे हात फैलावत नाही किंवा वाममार्गाचा अवलंब करीत नाही, विनम्रता ही त्या मनुष्यामध्ये आपोआप येते. संपत्ति किंवा सत्ता यांची धुंदी त्याच्यावर चढत नाहीं; कारण त्याला मिळालेली संपत्ति


† Historical Roll of Islam, Page 35.