पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
इस्लाम आणि संस्कृति

 आणि आपल्या भोंवतीं शिष्यगणांची प्रभावळ निर्माण करून जनतेला अक्षरश: नागविणाऱ्या ढोंगी धर्ममार्तंडांना कायमची मूठमाती मिळाली. एकेश्वरवादानें संत्रस्त जनतेचा केवढा मोठा फायदा झाला याचे भाई मानवेंद्र रॉय यांनी सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, " अंत:कलहानें विस्कळित झालेल्या जनतेची अंतरीची भूक महंमदाच्या कडव्या अद्वैताने तर भागविलीच, परंतु शेजारच्या राष्टांतूनही-जेथे सनातनीयांचा छळ असह्य झाला होता या ऐक्याच्या हांकेस 'ओ' मिळाली. मॅगीचा गूढवाद, ज्यूंचा पुराणाभिमान आणि ख्रिश्चनांचा दुरभिमान यांमुळे इराण, मेसॉपोटेमिया, सिरिया, ईजिप्त व पॅलेस्टाईन येथील लोकांचे धार्मिक जीवन अगदी गुंतागुंतीचे होऊन बसले होते. कडक धार्मिक विधी आणि आचार यांनी धर्माचें स्थान बळकाविलें होतें. ढोंगी समारंभांनी भक्तीची हकालपट्टी केली होती, शब्दप्रामाण्याने निष्ठेचा छळ चालविला होता. देवदूत, संत आणि शिष्यगण यांच्या मेळाव्यांत ईश्वर अदृश्य बनला होता; म्हणूनच अद्वैताची घोषणा करणाऱ्या नवीन सहिष्णु धर्माचे दलित व त्रस्त अशा बहुसंख्याक जनतेने स्वागत केले. बौद्धिक दिवाळखोरी, आध्यात्मिक गोंधळ, सामाजिक अव्यवस्था आणि धकाधकी यांच्या काळांत सामान्य जनतेला हव्या असलेल्या ऋजु निष्ठेचा आधार मिळाला आणि म्हणूनच या खवळलेल्या समुद्रांत जनतेचे तारूं सुखाने आपला मार्ग काढू लागले. एकच एक परमेश्वर आहे या विचारसरणीच्या प्रसारान अधिराज्याचा पाया घातला आणि त्या अधिराज्याच्या सर्व क्रियाच एकीकरण करण्यांत आले. या एकीकरणामळे नवीन सामाजिक घडी निर्माण झाली. या संस्कृतीचे मंदीर जन्या संस्कृतीच्या अवशेषांवर