पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
इस्लाम आणि संस्कृति



सर्वस्वी शरण जाणे असा समजला जातो. परमेश्वराचे जे गुणधर्म मानले जातात त्या गुणधर्माशी समरस होण्याचा मानवांना आदेश देणारा धर्म म्हणजे इस्लाम अशी त्याची व्याख्या केली जाते. इस्लाम धर्मीय लोकांना 'मुस्लिम' अशी संज्ञा आहे. सदाचार हे मुस्लिमांचे वैशिष्टय असले पाहिजे. इस्लाम धर्माचे प्रणेते हजरत मुहम्मद पैगंबर यांनी मुस्लिम कोणाला म्हणता येईल याचा स्पष्ट खुलासा केला आहे. ते म्हणतात, “जे विश्वासाने वागतात, आपला शब्द पाळतात व वचनास जागतात ते मुस्लिम होत. व्यभिचार करणारे, चोरी करणारे, दारू पिणारे, लूटमार करणारे व दुसऱ्याचा माल किंवा पैसा गिळंकृत करणारे, मस्लिम नव्हेत. जो आपण स्वतः पोटभर जेवतो व शेजाऱ्यास उपाशी ठेवतो तो मुस्लिम हाऊ शकत नाही."
 परमेश्वरावर अढळ विश्वास हे इस्लामचे आद्य तत्त्व होय. सर्वशक्तिमान परमेश्वराखेरीज इतर देवदेवतांवर इस्लाम विश्वास ठेवीत नाहीं. इस्लाम धर्मातील परमेश्वर हा कोणत्याही एका धर्माचा किवा राष्ट्राचा परमेश्वर नसून तो साऱ्या विश्वाचा अधिपती आहे. पवित्र कुराणमध्ये परमेश्वरास “रब्बुल आलमीन्” (जगाचा परमेश्वर) असे संबोधण्यात आले आहे. इस्लाम धर्मांतील परमेश्वराचे स्वरूप भयानक व अक्राळविक्राळ नसून ते अत्यंत प्रेमळ आहे. पवित्र कुराणच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीस अर-रहमान (उपकारकर्ता) व अररहीम(दयेचा सागर) अशा सुंदर नांवानें परमेश्वरास आळविले आहे. इस्लामची परमेश्वराबद्दलची कल्पना काय आहे याचे वर्णन पवित्र कुराणमध्ये केले आहे. " ईश्वर एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरा देव नाही. जे आपल्याला दिसत नाही व जे दिसतें तें जाणणारा