पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लामचा प्रसार

१५



आतांपर्यंत पाहिले नाही असें अत्यंत सामर्थ्यवान इस्लामी साम्राज्यएकदम अस्तित्वात आले. अॅटलांटिक महासागरापासून चीनपर्यंत, कास्पियन समुद्राच्या किनाऱ्यापासून हिंदी महासागरापर्यंत हे साम्राज्य पसरले."
 या अभूतपूर्व विजयपरंपरेबद्दल एक ग्रंथकार म्हणतो, "इस्लाम धर्माचा ध्वज पुढे पुढे चालला याचे कारण त्यांतील स्वातंत्र्य व समता ही तत्त्वे हेच होय. अरबांनी जे खिश्चन प्रदेश जिंकले तेथे गमतीची गोष्ट ही की, अरबांची प्रगती झाली आहे या भावनेनेंच सामान्य बहुजन मुस्लिम धर्माकडे आदराने पहात असत. खिश्चन सरकारांना हे लांछनास्पद आहे की त्यांची बहुतेक ठिकाणची राज्यव्यवस्था जुलमी होती. सिरियाच्या रहिवाश्यांनी मुस्लिमांचें स्वागतच केलें. इजिप्तच्या लोकांनी आपला देश अरबांच्या हाती | जावा असे प्रयत्न केले; आफ्रिकेतील स्वारीत बर्बरांनी मदत केली, कॉन्स्टॅटिनोपलच्या विद्वेषामुळे या सर्व राष्ट्रांना आपले देश अरबी सत्तेच्या स्वाधीन व्हावेत असे वाटले.*

 वरील उद्गारावरून, मुस्लिमांच्या पराक्रमाबरोबर त्यांची उदारवृत्ती, सहिष्णुता त्यांच्या विजयपरंपरेस कारणीभूत झाली आहेत असे आपणांस दिसून येईल. देश पादाक्रांत केल्यावर तेथील जनतेची मस्कटदाबी करून त्यांना सर्वस्वी गुलाम करून ठेवण्याचे कृत्य त्यांनी केलें नाहीं; तलवारीच्या जोरावर त्यांच्या धर्मावर आघात करण्याचा आततायीपणा त्यांनी केला नाही किंवा त्यांना अज्ञानांत ठेवून आपला वरचष्मा त्यांच्यावर सदैव राहील असा प्रयत्नही पण केला नाही.

* History of the Conflict between Religion & Science.
Page 98.

* Historical Roll of Islam, Page 54.