पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१८
इस्लाम आणि संस्कृति


मुस्लिमांची निर्घृण कत्तल चालविली. शहरांत सर्वत्र हाहा:कार उडाला; असहाय्य स्त्रियांच्या किंकाळ्यांनीं सर्व वातावरण भरून गेलें ; असंख्य मुस्लिमांचे मुडदे पडूं लागले; सबंध शहर रक्तानें न्हाऊन निघालें. उरलेल्या मुस्लिमांनी तेथील प्रचंड मशिदीकडे आश्रयार्थ धांव घेतली. " मुस्लिम नागरिकांनी मशिदीमध्यें आश्रय घेतला. सैन्याने त्यांची त्याच ठिकाणीं कत्तल उडविली. एकंदर एक लाख मुस्लिम ठार मारण्यांत आले व तितकेच कैदीही पण करण्यांत आले. वृद्ध स्त्रीपुरुषही त्यांच्या तावडीतून सुटले नाहींत."* जगा- मध्ये एकाच ठिकाणी एवढा प्रचंड संहार पूर्वी कधीही झाला नसेल. एकाच शहरांत घडून आलेल्या एक लाख लोकांच्या संहाराचें इब्न झलन् या इतिहासकाराने केलेलें हृदयविदारक वर्णन तर अंत:- करणाचा ठाव घेणारें आहे.

 थोड्याच काळांत ईजिप्तचा बादशहा सलाहुद्दीन याच्या' प्रभाव नेतृत्त्वाखालीं मुस्लिमांनीं पुन्हां जेरूसलेमबर धडक मारून तें कबी केलें. त्याच ठिकाणीं झालेल्या भीषण कत्तलीमुळे मुस्लिमांच्या अंतःकरणास झालेली खोल जखम भरून निघाली नव्हती; मागें झालेल्या प्रचंड संहाराची आठवण अद्याप बुजली नव्हती. शहरांतील प्रत्येक विश्वन नागरिकाची कत्तल करून भरपूर सूड उगविण्याची किंवा बदला घेण्याची या वेळीं सुवर्णसंधी चालून आली. सबंध शहराचे रक्तरंगण करून काढण्याचा समय प्राप्त झाला.

 याच वेळीं सलाहुद्दीनला हजरत मुहम्मद पैगंबरांनी दिलेल्या मानव्याच्या हांकेचें स्मरण झाले; पवित्र कुराणचा संदेश आठवला.


*Historian's History of the World, Vol. 8, P. 352-53.