पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१६
इस्लाम आणि संस्कृति


चामाचा आहे, प्रामाणिकपणाचा आहे असें कोणताही समंजस गृहस्थ म्हणूं शकेल काय ?

 जेथें कोणतेही पाप, अन्याय किंवा जुलूम निषिद्ध मानण्याचा आदेश मिळाला आहे, तेथे त्यापासून मिळालेला पैसा किंवा संपत्ति निषेधार्ह मानणे क्रमप्राप्त आहे. चांगल्या कार्याकरितां वाईट मार्गानें किंवा दुष्कृत्य करून मिळविलेला पैसा खर्च करणें म्हणजे त्या चांगल्या कार्याचें विडंबन करण्यासारखे आहे. योग्य व चांगल्या मार्गांनीं मिळविलेला पैसा सत्कार्याकरितां खर्च केला पाहिजे. यालाच आपण ' साधनशुचिता ' म्हणं. कार्याचें महत्त्वमापन साधनांच्या शुद्धतेवर व निर्मलतेवर अवलंबून असतें. अशुद्ध साधनांनी कोणतेंही साध्य केव्हांही उच्च कोटीला जाऊं शकत नाहीं.
 दुष्कृत्य किंवा कुकर्म यांची परतफेड करणें म्हणजे त्या दुष्कृ- त्यास योग्य उत्तर देणें अशी चुकीची कल्पना बनलेली असते. दुष्कृत्याचा बदला दुष्कृत्यांनी देणें म्हणजे आणखी एका दुष्कृत्याची भर घालणें होय. दुष्कृत्य होत असतां तें थांबविणें किंवा त्याला पायबंद घालणें आणि दुष्कृत्याची परतफेड करणें या दोन गोष्टीं- मध्यें मोठें अंतर आहे. पहिली गोष्ट जितकी अभिनंदनास्पद तितकी दुसरी गोष्ट इस्लामनें त्याज्य मानली आहे. पहिल्या गोष्टीमध्ये न्यायाचा आविष्कार होतो तर दुसऱ्यामध्ये द्वेष किंवा सूडबुद्धीला प्रोत्साहन मिळतें. हजरत पैगंबरांनीं दुष्कृत्याची फेड सत्कृत्यांनी केली आहे. त्यांच्या शत्रूंनीं निरपराध लोकांना छळले म्हणून त्यांना तसेंच छळून सूड घेण्याचें निंद्य व अमानुष कृत्य त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यांत कधींही केलें नाहीं; उलट त्यांना दयाळूपणानें बागविल्याचीं अनेक उदाहरणें इस्लामच्या इतिहासांत दिसून येतील.