पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१०
इस्लाम आणि संस्कृति


वादित्व यांना कधींच जागा मिळू शकत नाहीं. संस्कृतीमध्ये बौद्धिक व मानसिक विकासास मानाचा दर्जा आहे, विज्ञान व आधि- भौतिक शास्त्रांना श्रेष्ठ स्थान आहे.

 इस्लामच्या इतिहासाची आपणांस जी ओझरती ओळख झाली त्यावरून आध्यात्मिकता व भौतिकता यांचा सुंदर समन्वय इस्लाम- मध्यें झाला आहे असें आपणांस म्हणावें लागेल. भौतिकता ही आध्यात्मिकतेला मारक नसून ती पोत्रकच आहे असें इस्लाम मानतो; भौतिकता हा शाप नसून वर आहे अशी इस्लामची श्रद्धा आहे. यामुळे इस्लाम धर्मांत आध्यात्मिकतेचा आधिभौतिक शास्त्राशीं केव्हांच विरोध दिसून येत नाहीं. भौतिक शास्त्रांचा उपयोग मानवाचें सुख किंवा दर्जा वाढविण्याकडे होईल; त्याचप्रमाणें त्याला गुलाम करून सोडणें किंवा संत्रस्त करणें यांकडेही करतां येईल. ज्या भावनेनें किंवा दृष्टीनें आपण त्यांचा उपयोग करूं, त्याप्रमाणें त्याचें इष्ट वा अनिष्ट फल आपल्या पदरांत पडूं शकेल. या शास्त्रांना आध्यात्मिकतेची जोड दिली तर हींच शास्त्रें ऐहिक जीवन सुखमय करतील, त्याच्या उत्कर्षाचीं द्वारें खुलीं करून देतील, त्याचा अंकाली बळी घेणाऱ्या रोगराईचा नाश करतील, त्यानें कधींही अनुभविलें नाहीं अशा उच्च दर्जाचें सुख त्याला प्राप्त करून देतील असा इस्लामला विश्वास वाटतो. त्यामुळे मागील प्रकरणांत विज्ञान च आधिभौतिक शास्त्रांच्या निरनिराळ्या क्षेत्रांत मुस्लिमांनीं जी प्रगती केली तिच्या बुडाशीं मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न होता ही गोष्ट अधिक स्पष्ट होते.
 इस्लाम हा स्वागतप्रेमी आहे हें त्याचें आणखी एक वैशिष्टय होय. मानव जातीच्या सौख्य व उत्कर्षास हातभार लावणाऱ्या