पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२००
इस्लाम आणि संस्कृति

मनाशी बांधून अरब मुस्लिमांनीं त्या क्षेत्रांत बरेंच संशोधन केलें आहे. बी-बियाणे यांवर निरनिराळे प्रयोग करून शेतीला आवश्यक असणाऱ्या अनेक अवजारांचे शोध त्यांनी लाविले आहेत. पाटबंधारे व कालवे यांचें जनकत्व तर त्यांच्याकडेच जाते. पर्वतावरून वाहणारे पाण्याचे प्रवाह अडवून त्यांचा उपयोग जमीन भिजविण्यांत ते करीत. समृद्ध पीक यावें याकरितां खताचा उपयोग त्यांनींच सुरू केला. एका खड्डयांत खत घालून ते ठराविक काळापर्यंत त्यांत ठेवीत व नंतर तें खत शेतीस वापरीत. कृषिशास्त्रामध्ये त्यांनी केवढी पारंगतता मिळविली आहे यावित्रयीं एका ग्रंथकाराने काढलेले उद्गार मनन करण्यासारखे आहेत. तो म्हणतो, हवा व माती यांचें पूर्ण ज्ञान करून घेऊन त्यांनी शेतकीचें संशोधन केलें आहे.... अरबांच्या शेतकीशास्त्राइतकें अत्यंत उपयुक्त व परिपूर्ण शास्त्र युरोप, आशिया किंवा आफ्रिका खंडांतील एकाही राष्ट्रांत नव्हतें." + अबू उमर, अबू अब्दुल्ला व अबू झक्रीया या तज्ज्ञांनी शेतकीशास्त्रावर अमूल्य ग्रंथ लिहून ठेविले आहेत.

 मुस्लिम् अमदानीत उद्योगधंद्यांना अत्यंत प्रशंसनीय असें उत्तेजन मिळाल्यामुळे उद्योगधंद्याचा विकास व उत्कर्ष झाला. सोनें, चांदी, लोखंड, शिसें वगैरे अनेक धातू खाणीमधून काढण्याचें शास्त्र त्यांना चांगलें अवगत होतें. पोलादाची प्रचंड प्रमाणावर त्यांनी निर्मिती केली. या सर्व धातूंचे जिन्नस तयार करण्याचे अनेक कारखाने अरब मुस्लिमांनी प्रस्थापित केले. यांखेरीज कांचसामान, मातीचीं डौलदार भांडीं, तलम कापड, रेशीम व लोकरीचे कपडे तयार करण्यांत त्यांनी अग्रपूजेचा मान मिळविला आहे. " नुसत्या


+ The History of Mahomedan Empire in Spain, P.260.