पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लामचा प्रसार

११




तेथील नागरिकांना यत्किंचितही त्रास देण्यांत आला नाहीं; इतकेंच नव्हे तर त्यांची मालमत्ता त्यांच्या स्वाधीन ठेवण्यांत आली. त्यांच्या उपासनेत कसलाही व्यत्यय आला नाही. खिस्ती लोक, त्यांचे धर्मगुरु व त्यांचे कुलपती यांसाठी त्या शहरांत स्वतंत्र विभाग राखून ठेवण्यांत आला....धर्मयुद्धाच्या शेवटी ज्या वेळी जेरूसलेम परत देण्यांत आले, त्या वेळी तेथील पौर्वात्य ख्रिस्ती लोकांना मुस्लिम खलिफांच्या सहिष्णु राज्याची अत्यंत आठवण होत असे."
 खलिफांच्या या दिलदार वृत्तीमुळेच इस्लाम प्रसाराचा मार्ग पुष्कळसा सुगम झाला. जित देशांतील नागरिकांना मुस्लिमांच्या या औदार्यपूर्ण मनोवृत्तीबद्दल अत्यंत आदर वाटे; कारण जेत्यांकडून अशा त-हेची उदार वागणूक त्यांना कधीही मिळाली नव्हती. त्यांच्या देशावर रोमन, इराणी लोकांच्या स्वाऱ्या होत, त्या वेळी त्यांची संपत्ति लुटली जात असे, अनन्वित अत्याचार घडत, सबंध देश रक्ताने न्हाऊन निघत असे. मुस्लिम व ख्रिश्चन जेत्यांच्या या परस्पर विरोधी वृत्तीचे पृथ:करण करतांना पॉवेल नांवाचा विख्यात लेखक म्हणतो, " या विजयाच्या लढ्यामध्ये मुस्लिमांनी जी उदारवृत्ती दाखविली, ती पाहून कित्येक ख्रिश्चन राष्ट्रांनी लाजेनें खाली माना घातल्या." या उदार वृत्तीची फेड ख्रिश्चन जेत्यांनी कशी - केली याचे विवरण शेवटच्या प्रकरणांत विस्ताराने केले आहे, तिकडे वाचकांनी अवश्य लक्ष द्यावें.

 मुस्लिमांना ठिकठिकाणी जे स्पृहणीय विजय मिळाले, त्याची कारणपरंपरा भाई मानवेंद्र रॉय यांनी उत्कृष्ट रीतीने दाखविली आहे. ते म्हणतात, “ धर्मवेडया लोकांची लुटालूट म्हणजेच इस्लामचा इतिहास


† The Struggle for Power in Asia, Page 48.