पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६
इस्लाम आणि संस्कृति



बगदादचे खलिफा अल मामून यांच्या कारकिर्दीत भूमितीचा ( Geometry ) अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला गेला. त्यांच्या आश्रयाखालील विद्वान् अरब शास्त्रज्ञांनी युक्लिड, थिओडोसियस् , हेप्सीक्लस, मेनलास आणि अपोलोनियस या शास्त्रज्ञांच्या भूमितीवरील महत्त्वाच्या ग्रंथांची भाषांतरें अरबी भाषेमध्ये केली. वरील विद्वानांच्या तोडीचे भमितिशास्त्रज्ञ अरबांमध्ये निर्माण झाले. त्यांनी भमितीवर लिहिलेले ग्रंथ व प्रबंध अद्याप काळजीपूर्वक अभ्यासिले जातात. अरब भमितिशास्त्रज्ञांविषयीं एक ग्रंथकार लिहितो :-

 "ग्रीक विद्वानांच्या ग्रंथांवर ज्यांनी अधिकारवाणीने टीका केली आणि विशदीकरण केले असे अनेक प्रख्यात भूमितिशास्त्रज्ञ अरबांमध्ये निर्माण झाले.* त्रिकोणमिति (Trigonometry) सारख्या गणित शास्त्राच्या शाखेत अरब लोकांनी प्रावीण्य संपादिले होते. त्यांनी त्रिकोणमितीस दिलेले नवीन स्वरूप अजूनही कायम आहे. त्या शास्त्रांत Chord ऐवजी Sines चा उपयोग करण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली.. मोहमंद बिन मुसा व मोहमंद अल-बगदादी या शास्त्रज्ञांनी त्रिकाणमितीवर स्वतंत्र ग्रंथरचना केली आहे.

 खलिफा अल मामन यांना गणित शास्त्राच्या ज्ञानाबद्दल केवढा जिव्हाळा वाटत होता हे पुढील उदाहरणावरून सिद्ध होईल. त्या काळी ग्रीक बादशहाच्या पदरी लिओ नांवाचा अत्यंत विद्वान गणिती होता. त्याची कीर्ति ऐकन खलिफांनी आपण होऊन लिओस स्वदस्तुरचे पत्र लिहिले. त्या पत्रांत त्यांनी लिओच्या


* History of Mahometan Empire in Spain, P. 253.