पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२
इस्लाम आणि संस्कृति


सारख्या अनेक रसायनक्रिया त्यांनीच करून दाखविल्या. Decantation ची उपयुक्त पद्धती त्यांनी प्रचारांत आणली. त्यांनी कित्येक रसायनें, आम्लें व क्षार अस्तित्वात आणली व अनेक अमोल औषधींचा शोध लावला, प्रयोगपद्धतींनी व संशोधनांनी सध्यांच्या रसायनशास्त्राचा मजबूत पाया घालण्याचे श्रेय सर्वस्वी अरबांनाच दिले पाहिजे.

 एक ग्रंथकार म्हणतो, " रसायनशास्त्राचा प्रारंभ व विकास हा अरबांच्याच प्रयत्नाने झाला. बाष्पीकरणाची साधने यांनीच शोधून काढली. घन, द्रव व वायुरूप पदार्थांची छाननी त्यांनीच प्रथम केली. आल्कली व आम्ल यांच्यांतील साम्यभेदाचे प्रयोगही त्यांनीच केले आणि अनेक खनिज पदार्थांचे गुणकारी औषधांत रूपांतरही त्यांनीच केलें."* डॉ. डेपर यांनी काढलेले उद्गार मननीय आहेत. ते म्हणतात, " रासायनिक प्रक्रियेसंबंधी-विशेषतः द्रव्यांच्या उध्वपातनाला लागणाऱ्या प्रक्रियेसंबंधी त्यांनी (अरबांनी) माठा सुधारणा केली. तीन महत्त्वाचे खनिज क्षार शोधले वनस्पतिजन्य आणि खनिज अल्कलींतील फरक दाखविला; मद्याक तयार करण्याची क्रिया सुरू केली. अलीकडे रूढ असलेल्या द्रव्याच्या नामाभिधानावरून रसायनशास्त्र अरबी लोकांचें केवढे ऋणी आह १ सिद्ध होतें. वरील विधानाची सत्यता पटविण्यास अल्कोहल, अलेंबिक, अलकली हे शब्दच पुरे आहेत.

 गिबर, मुसा, राझी या अरब रसायनशास्त्रज्ञांची गणना जगांतील प्रसिद्ध शास्त्रज्ञांमध्ये होते. त्यांनी अनेक रासायनिक पद्धती शोधून काढल्या आणि अनेक शुद्ध औषधी क्षार तयार केले. रॉजर बेकन,


* Historical Roll of Islam, P. 80.