पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लामचा प्रसार




 हजरत महम्मद पैगंबरांनंतर हजरत अबुबकर यांची खलिफा (राज्यप्रमुख) म्हणून निवड झाली. इस्लामधर्म व राष्ट्र यांचे नेतृत्व स्वीकारण्याची जी प्रचंड जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती ती त्यांनी यशस्वीरीतीने पार पडली. त्यांची कारकीर्द फक्त २ वर्षे ३ महिनेच झाली; पण इतक्या अल्पावधींत इराक, सिरियाचा दक्षिणभाग, पर्शिया व बायझंटाईन साम्राज्यामधील कांहीं प्रदेश हस्तगत करण्यांत आला. खालीदसारखा पराक्रमी सेनापति मुस्लिम सैन्याला मिळाल्यामुळे. इतक्या लवकर वरील प्रदेश काबीज करणे शक्य झाले. त्यानंतर हजरत उमर खलिफा बनले. त्यांनी दहा वर्षे सत्ता गाजविली.. 2 हजरत उमर यांची कारकीर्द म्हणजे इस्लामी इतिहासामधील दैदिप्यमान काळ असे समजले जाते. त्यांचा निःपक्षपाती कारभार आणि त्यांनी केलेल्या अनेक सुधारणा आज चिरंजीव होऊन राहिल्या आहेत. राज्यप्रमुख म्हणजे प्रजेचा सेवक ही म्हण त्यांनी यथार्थतेने अमलांत आणली होती. रात्री शहरांतून गस्त घालीत असतां एका अनाथ स्त्रीचे कण्हणे ऐकून, त्यांनी समक्ष चौकशी केली. त्या बाईस प्रसूति-वेदना होत असून तिच्याजवळ कोणीही नाही असें दिसून आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पत्नीस बोलावून आणले व तिच्या हातून त्या बाईचे बाळंतपण सुखरूपपणे करविले. न्यायाच्या बाबतींत हजरत उमर यांनी इस्लामची शिकवण तंतोतंत अमलांत आणली होती. आपला स्वतःचा मुलगा दोषी आहे असे सिद्ध झाल्यानंतर त्याला फटके मारावयास कोणीच धजेना. हजरत उमर यांनी स्वतः आपल्या हातांत आसूड घेतला आणि आपल्या मुलाच्या उघड्या अंगावर फटके लगावले.

 हजरत उमर यांच्या कारकीर्दीत मुस्लिमांनी बॅबिलोन पादाक्रांत