पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रे
इस्लामचा प्रसार




 " मुहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर पहिल्या शतकांतील मुस्लिम विजयाची कथा म्हणजे जगाच्या इतिहासांत आश्चर्याने थक्क करून सोडणारी घटना होय."

-प्रो. सी. आर नॉर्थ.


 हजरत मुहम्मद पैगंबरांच्या मत्यूनंतर, त्यांच्या एकनिष्ठ अनुयायांनी जो अभूतपूर्व विजय मिळविला, त्याला जगाच्या इतिहासांत कचित्च तोड मिळेल. अरबस्तानसारख्या मागासलेल्या राष्ट्रांतील मुस्लिमांनी प्रचंड अशा रोमन साम्राज्याशी टक्कर मारून तें खिळखिळे करून टाकलें, पर्शिया व बायझंटाईनसारख्या बलाढ्य राष्ट्रांना धूळ चारली व पैगंबराच्या मृत्यूनंतर अवघ्या तीस वर्षांत अॅटलांटिक महासागरापर्यंत आपला विजयध्वज फडकावून अर्ध्या युरोपखंडावर स्वामित्व मिळविलें ही गोष्ट सर्वांना विस्मित करून टाकणारी आहे.
 पराक्रम हा अरबांचा अभिजात गुण; तलवार आणि घोडा म्हणजे अरबांचे पंचप्राण ही समजूत सर्वत्र प्रचलित होती. लढाऊ शिक्षणाचे बाळकड़ प्रत्येक अरबास मिळत असे. बेडरपणा हा अरबाच्या हाडीमांसीं खिळल्यामुळे समरभूमी म्हणजे क्रीडांगण असें त्यांना वाटे. या धाडसी व पराक्रमी मनोवृत्तीस ऐक्य व समानध्येय यांची जोड मिळाल्यामुळे अरबांनी जगाला थक्क करून सोडणारे विजय मिळविले.


† An Outline of Islam, Page 39.