पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१६४

इस्लाम आणि संस्कृति

विचारसरणीमुळे त्यांना धर्मपंडितांचा रोष सहन करावा लागला. दुर्दैवाने वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांचा शिरच्छेद करण्यांत आला. 'किताब नाकिहात,' 'हिकमतुल इशराक,' 'हयकल,' 'किताबुत तलवीहात' 'बलागत नामा' वगैरे अनेक ग्रंथांनी यांची स्मृती मागे ठेविली आहे. इमाम फक्रुद्दिन राझी नांवाच्या तत्त्वज्ञांचा जन्म इ. स. ११६६ साली झाला. तत्त्वज्ञानाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी आपला मतभेद आपल्या अनेक ग्रंथांतून केला आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी म्हणजे इ. स. १२१२ साली ते मृत्यु पावले.
 अल-गज्झाली या तत्त्वज्ञांचे नांव तर सर्वतोमुखी झाले आहे. त्यांचे संपूर्ण नांव हाज्जतुल इस्लाम इमाम मुहम्मद असून त्यांचा जन्म इ. स. १०७२ मध्ये झाला. वयाच्या ३४ व्या वर्षी त्याना एवढी विद्वत्ता संपादन केली की त्यांना बगदादच्या प्रसिद्ध निझामिया महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून नेमण्यांत आले. त्यांना आपल्या पंचावन वर्षांच्या अल्प आयुष्यांत ७० ग्रंथ लिहून जगाच्या तत्त्वज्ञानात फार मोठी भर घातली आहे. नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान वगैरे अनेक विषय त्यांनी आपल्या ग्रंथात हाताळलेले आहेत. त्यांच्या अनेक ग्रंथांपैकी पुढील ग्रंथाचा लॅटिन व जर्मन भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत : (१) अल मुनकिज मिन दलाल (२) तहाफतुल फिलसफा (३) मीजानुल अमल (४) इहयाउल उलूम (५) वजीज (६) मिहकुन नजर (७) मियारुल इल्म (८) मकासिदुल फिलसफा.
 चिकित्सावाद हे अल-गज्झालींच्या तत्त्वज्ञानाचे खास वैशिष्ट्य आहे. ज्ञान हे अचुक असले पाहिजे आणि ते अवलोकन व प्रयोग