पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१४३



मारक ठरते असें इस्लाम आग्रहाने सांगतो. मकझम वंशांतील एका श्रीमंत व्यक्तीने गुन्हा केल्यावर, त्याबद्दल रदबदली करण्याकरिता उसमा बिन झैद नांवाचे त्या व्यक्तीचे वजनदार नातेवाईक हजरत पैगंबरांकडे आले असतां हजरत पैगंबर म्हणाले, “परमेश्वराच्या कायद्याविरुद्ध मी ढवळाढवळ करावी या हेतूने आपण माझ्याकडे आला आहांत काय?". हजरत पैगंबरांनी एक सभा बोलाविली व वरील प्रकारास उद्देशून ते म्हणाले, "आपल्या अगोदरची जी राष्ट्र होती, त्या राष्ट्रांत गरिबांना शिक्षा करावयाची व श्रीमंताच्या बाबतींत कायदा सैल करावयाची जी वृत्ति होती त्यामुळेच ती राष्टें रसातळास गेली."

 “तुमच्या, तुमच्या आईबापांच्या, नातेवाईकांच्या किंवा गरीबश्रीमंतांच्या विरुद्ध न्याय द्यावा लागला तरी त्याची पर्वा न करतां परमेश्वरास साक्ष ठेवून न्यायाचे परिपालन करा."

-पवित्र कुराण ४:१३५.

 आपले आईबाप, आप्तेष्ट यांच्या विरुद्धही न्याय द्यावा लागला तर तो आपण निस्पृहपणे दिला पाहिजे. एकाद्या श्रीमंत गृहस्थाच्या विरुद्ध आपण आपले मत प्रदर्शित केल्यास त्याचा रोष आपणांस सोसावा लागेल याबद्दल भीति बाळगतां कामा नये; इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष आपल्याविरुद्ध एकादा आरोप केला गेला तर तो लपविण्याचा प्रयत्न न करतां आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे किंवा आपण अपराधी आहोत असें कबूल केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने इतकें नीतिधैर्य दाखविले तर जगामध्ये सत्ययुग प्रत्यक्षात उतरल्याखेरीज राहणार नाही. इस्लामच्या या उज्ज्वल संदेशाप्रमाणे निस्पृह न्यायदान केल्याची अनेक उदाहरणे आपणांस