आपला स्वार्थ, अप्पलपोटेपणा, संपत्तीची हांव बाजूला ठेवून माणुसकीच्या दृष्टीने आपण राष्ट्राकडे पाहूं लागलो तर आर्थिक दुःस्थिति दूर व्हावयास फारसा वेळ लागणार नाही. या दृष्टीने पवित्र कुराणने दिलेला आदेश प्रत्येकाने आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवण्यासारखा आहे.
"त्यांना सांगा की आपल्या गरजेपेक्षा जास्त असेल तें सर्व दुसऱ्यांना देऊन टाका."
इस्लामचा हा बहुमोल उपदेश जर आचरणांत आणून दाखविला तर जनतेच्या आर्थिक स्वास्थ्यास केवढी तरी मदत होणार आहे. अशा तऱ्हेचें औदार्य जर प्रत्येकाने दाखविलें तर आर्थिक अनावस्था हा शब्द अस्तित्वांत देखील राहणार नाही. वरील वाक्यांत बंधुतेला आवाहन करण्यांत आले आहे. बंधुत्वाच्या भावनेने दुसऱ्याशी वागा हाच अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहे. जनतेमध्ये बंधुत्वाच्या भावना जितक्या जास्त प्रमाणांत फैलावतील तितक्या प्रमाणांत आर्थिक परिस्थिति निवळत जाईल. इस्लामने राज्यशास्त्रांत बंधुतेला जे महत्व दिले आहे ते यामुळेच.
समता हा लोकशाहीचा फार मोठा आधार आहे. ज्या ठिकाणी समता नाही त्या ठिकाणी निर्भेळ लोकशाही संभवत नाही. ज्या राष्ट्रामध्ये काळागोरा असा भेद केला जातो. उच्चनीचपणाचे कप्पे पाडले जातात, स्पृश्यास्पृश्य असा भेद केला जातो त्या राष्ट्राने लोकशाहीचा कितीही डांगोरा पिटला तरी ती लोकशाही या नावास कदापिही पात्र होऊ शकणार नाही. लोकशाही म्हटली की त्या