पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१३१


 अल्लाचे कार्य म्हणजे मानव्याचे कार्य; त्या कार्याकरितां आपली संपत्ति खर्च करणारास इस्लाममध्ये थोर दर्जा आहे. जनतेच्या कल्याणाकरितां किंवा स्वास्थ्याकरितां आपल्या गडगंज संपत्तींतून एक पैसाही न खर्च करतां त्या संपत्तीचा सांठा करणारा गृहस्थ तुच्छ व हीन मनोवृत्तीचा समजला जातो. अशा गृहस्थास असह्य हाल भोगावे लागतात असें इस्लाम समजतो. संपत्ति मिळविण्याचे सर्व मार्ग आपल्या मालकीचे करण्यास इस्लामचा सक्त विरोध आहे. व्यापार किंवा उद्योगधंद्यांतील मक्तेदारीस इस्लाममध्ये स्थान नाही. मालाचे उत्पादन किंवा विक्री करण्याचा एकमेव हक्क देण्यास इस्लाम मनाई करतो. अनेकांच्या परिश्रमावर एका व्यक्तीचा अफाट फायदा हे दुष्ट तत्त्व यांच्या बुडाशी असल्यामुळे तें ग्राह्य मानले जात नाही. या ऐवजी इस्लामने एक नवीन योजना प्रसृत केली आहे. एकटयाने जमिनीचे पीक किंवा मालाचे उत्पादन करण्यापेक्षा तें सामुदायिक रीतीने करणे अधिक श्रेयस्कर आहे. सामुदायिक गीत्या शेती करावयाच्या पद्धतीस ' मुजारअत' अशी संज्ञा आहे. खेड्यांतील जमीन तेथील सर्व शेतकऱ्यांना कसावयास देणे किंवा सरकारने स्वतः आपल्या संबंधी खात्याकडून त्या जमिनीची मशागत करून पीक काढणे हे दोन्ही प्रकार वरील पद्धतीत समाविष्ट होतात खेड्यांतील सर्व शेतकऱ्यांना जमीन देण्यांत आली तर त्यांच्या गरजा व उदरनिर्वाह यांपुरतें अन्नधान्य राखून ठेवून बाकीचे सर्व सरकारचें हवाली करावयाचे असते.

 वैयक्तिक व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र त्या व्यापाऱ्याला व्यापाराची मक्तेदारी कधीही मिळत नाहीं व्यापार किंवा धंदा यांवर सरकारने नियंत्रण ठेवावयाचे आहे.