पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लामपूर्व जग




पण असा मत्यु क्वचितच येत असे.' वरील उद्गारांवरून मानवी जीवित किती अशाश्वत व धोक्याचे होते याची आपणांस कल्पना येईल.

 अरबस्तानमध्ये तर अधःपाताचा कळसच झाला होता. बेबंदशाही, खून,लांचलुचपत, मदिरासक्ति, जुगार, व्यभिचार इत्यादि प्रकार विनासंकोच सर्व देशभर चालू होते. जीविताची शाश्वती तर कोणालाच वाटत नसे. कोणाच्या तलवारीला केव्हां बळी पडावे लागेल याचा काही नेम नव्हता. 'बळी तो कान पिळी' या तत्त्वाचा अवलंब सर्वत्र केला जात असे. अरब जन्मतःच शूर व बेडर पण या शूरपणाचा व बेडरवृत्तीचा दुरुपयोग झालेला दिसून येई. त्या ठिकाणी कोणतीही राज्यसत्ता नसल्यामुळे तेथील जनता बेलगामी वृत्तीने वागे. धर्म म्हणजे काय चीज आहे हे तेथील जनतेस माहित नव्हते. वाडवडिलांनी जी रूढी घालून दिली, तिचे अवलंबन करणे ती आपले कर्तव्य समजे. त्या काळी मूर्तिपूजेचे विलक्षण बंड होते. मूर्तीपुढे दर रोज हजारों जीवांची हत्त्या होत असे; इतकेच नव्हे तर कित्येक ठिकाणी मानवांचे बळी दिले जात. मक्केमधील प्रसिद्ध अशा काबा मंदिरांत ३६० मूर्ती बसविल्या होत्या. प्रत्येक दिवशी एकेका मूर्तीची पूजा केली जाई. पूजा चालू असतां, नग्न स्त्रियांचा नाच चालं असे. प्रसाद म्हणून मदिरेची मुक्त हस्तानें खैरात होई. मदिरापान हे अरबांचे सर्वांत मोठे व्यसन. प्रत्येक व्यक्तीने दररोज मदिरेचा आस्वाद घेतलाच पाहिजे असा रिवाज रूढ होता. रस्त्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर दारूचे हंडे भरून ठेविलेले असत. अरबांचे दुसरे मोठे व्यसन म्हणजे जुगार. गल्लोगल्ली जुगाराचे अड्डे चालत. सर्व पैसे संपले म्हणजे अरब स्वतःला पणाला लावीत.