पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१२३



संरक्षण कर. त्याबरोबर दारिद्र्य किंवा दुर्दैव यांपासून त्यांची सुटका करून त्यांना स्वास्थ्य मिळेपर्यंत विश्रांति घेऊ नकोस."

 आजच्या पाश्चात्य राष्ट्रांना लोकशाहीचा मोठा अभिमान वाटतो. आज सर्व जग लोकशाहीकडे भरधाव जात आहे; पण ही लोकशाही जगामध्ये पहिल्या प्रथम प्रस्थापित करण्याचा मान इस्लामने मिळविला आहे असे जागतिक राजकारणाचा अभ्यास करणारांना दिसून येईल. ज्या काळी सर्व जगांत साम्राज्यशाहीचा उदो उदो चालला होता, सरंजामशाहीला प्रोत्साहान मिळत होते, ज्याच्या मनगटांत जोर तो सत्ताधीश अशी परिस्थिती होती, जनतेचे मन किंवा संमती कस्पटासमान मानली जात होती अशा काळांत इस्लामने लोकशाहीचा प्रथमच पुकारा केला. सोळाव्या शतकांत राजा व प्रजा यांच्यामधील यादवीस सुरुवात झाली; त्याचे पर्यवसान सन १६८८ साली फ्रेंच क्रांतीमध्ये होऊन लोकशाहीची बीजे पेरली गेली. तेव्हांपासून युरोपमध्ये लोकशाहीचा अवतार झाला असे आपणांस म्हणावें लागेल. या लोकशाहीच्या जवळ जवळ एक हजार वर्षे अगोदर जंगली समजल्या जाणाऱ्या अरबस्तानांत लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवण्यांत येऊन, हजरत पैगंबरांना लोकांनी निवडून दिलेला पहिला सर्वाधिकारी होण्याचा मान मिळाला. त्यांच्यानंतर हजरत अबूबक्र हे खलिफा झाले.

 राज्याचा प्रमुख म्हणून जनतेने निवडून दिलेल्या सर्वाधिकाऱ्यास खलिफा, इमाम किंवा अमीरुल मोमीनीन अशा संज्ञा आहेत. निवडून आल्यानंतर खलिफांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून कोणताही निर्णय घ्यावयाचा असतो. एकदां निवडन