पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

११९



घरचे अठरा विश्वे दारिद्य पाहून त्या शिष्टमंडळास अचंबा वाटला. त्यांनी खलिफांचा नजराणा म्हणून दिनारांनी भरलेलें ताट त्याच्या हवाली केले व आपला हेतु निवेदन केला. पंडित माणिकशास्त्रयांनी नजराण्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार केला. आपल्या कुटुंबांतील मंडळींची व्यवस्था करून ते बगदादेस निघाले. बगदाद येथे पोहोंचल्यानंतर त्यांना खलिफांचे भेटीस नेण्यांत आले. त्या वेळी दरबार भरला होता. माणिकशास्त्री शाही दरबारांत येतांच खलिफांनी त्यांना उत्थापन दिलें व उच्चासनावर बसविलें. परधर्मीयाचा इतका आदरसत्कार पाहून दरबारी मंडळी चकितच झाली. त्या वेळी अलमामन यांनी काढलेले उद्गार अंतःकरणावर कोरून ठेवण्यासारखे आहेत. ते म्हणाले, " हा मानसन्मान, हा आदरसत्कार माणिकशास्त्री या व्यक्तीचा नाही तर तो आपल्या परमपूज्य हजरत पैगंबरांचा सत्कार आहे असें मी समजतो. 'विद्वानांचा सन्मान हा माझा सन्मान आहे' अशी हजरत पैगंबरांची आपणा सर्वांस आज्ञा आहे. त्या आज्ञेचे पालन करावयाची संधि मला मिळाली याबद्दल मला आनंद वाटतो." पंडित माणिकशास्त्र्यांनी भाषांतर करण्याचे कार्य परें केल्यानंतर त्यांना मोबदला म्हणून त्यांच्या वजनाइतकें सोने बहाल करण्यांत आले, आणि पंडित माणिकशास्त्र्यांची स्मति कायम राहावी म्हणून त्या भाषांतरित ग्रंथास “ अल-मन्याक" असें नांव देण्यांत आले. अद्याप हा ग्रंथ बगदादच्या लायब्ररीत जपून ठेवण्यांत आला आहे. शेवटी पंडित माणिकशास्त्री यांना मोठया इतमामाने काशीस पोहोचविण्यांत आले. मुस्लिमांची विद्येविषयी एवढी आसक्ति व विद्वानांविषयीं एवढा आदर हाच इस्लामी तत्त्वज्ञानाचा मानबिंदु होय.