पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

११५


हुतात्म्यापेक्षा एक श्रेष्ठ व्यक्ति या जगतांत आहे आणि ती म्हणजे विद्वान् गृहस्थ होय. हुतात्म्याच्या रक्तापेक्षा त्या विद्वानाच्या लेखणीतला शाईचा एक थेंब अधिक मोलाचा आहे, अधिक पवित्र आहे. आपल्या लेखणीतील शाईच्या एकेक थेंबागणिक तो हुतात्मा निर्माण करूं शकतो या महान् व प्रभावशाली तत्त्वज्ञानाचे जनकत्व इस्लामकडे आहे हे आपण कदापिही विसरता कामा नये.

 इस्लामने शिक्षणाचा केलेला जबरदस्त पुरस्कार, ज्ञानोपासनेबद्दल दाखविलेली नितांत आसक्ति, विद्वान् माणसाला प्राप्त करून दिलेलें श्रेष्ठ स्थान यांमुळे विद्येचे अव्वल दर्जाचे उपासक म्हणून मुस्लिमांचा गौरव झाला अशी इतिहास साक्ष देत आहे. तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान वगैरे ज्ञानक्षेत्रांत मुस्लिमांनी केवढें प्रशंसनीय कार्य केले आहे याची कल्पना पुढील एका प्रकरणावरून वाचकांना येईल. इस्लामची उदात्त शिकवण आपल्या समोर ठेवून मुस्लिम नेते, खलिफा व बादशहांनी विद्येची व ज्ञानाची जी अमोल सेवा केली आहे तिचा इतिहास कदापिही पुसला जाणार नाही. त्यांनी विद्येला दिलेलें प्रोत्साहन, विद्वानांना दिलेला उदार आश्रय, साहित्यिकांचा केलेला गौरव, ठिकठिकाणी प्रस्थापित केलेली विद्यापीठे व ज्ञानकेंद्रे या सर्व गोष्टी त्यांच्या सुसंस्कृततेची सदैव साक्ष देत राहतील.

 पवित्र इस्लामच्या आदेशानुसार मुस्लिम खलिफा व राज्यकर्ते विधेस कसे प्रोत्साहन देत याचे वर्णन प्रो. शुस्तरी यांनी केले आहे. " हारून-अल-रशीद व त्यांचा मुलगा यांच्या कारकीर्दीत असंख्य विद्यालये उघडली गेली, विद्यापीठे प्रस्थापित झाली, ग्रंथालयांची प्राणप्रतिष्ठा करण्यांत आली, वेधशाळा बांधण्यांत आल्या. पुष्कळ विद्यालयांत मुस्लिम व परधर्मीय विद्यार्थी एकत्र अभ्यास