पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

१०७


करण्याकरितां इस्लाममध्ये स्त्रियांना घटस्फोटाचे स्वातंत्र्य देण्यांत आले आहे. नवरा वाटेल तेवढा बदमाश असला, दुर्वर्तनी असला, त्याने वाटेल तेवढी मारझोड केली किंवा तिला क्रूरपणे वागविले तर एक शब्दही न उच्चारतां त्याच नवऱ्याजवळ जन्मभर आयुष्य कंठले पाहिजे, अशा त्या काळी प्रचलित असलेल्या कायद्यास कायमची मूठमाती देऊन इस्लामने स्त्रीजगतावर विलक्षण उपकार करून ठेविले आहेत.

 इस्लाममध्ये स्त्रियांबद्दल इतका उदारमतवाद असतां बहुपत्नीकत्वाची पद्धत कां असावी असा कोणी प्रश्न विचारला तर तो योग्यच ठरेल. इस्लाम धर्मात जास्तीत जास्त चार स्त्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या वेळी ही परवानगी देण्यांत आली त्या वेळी ओहोदची लढाई नुक्तीच संपली होती. त्या लढाईत मुस्लिम मारले गेल्यामुळे असंख्य स्त्रिया विधवा झाल्या व अनेक मुलें पोरकी व अनाथ झाली. या विधवांचा व मुलांचा संभाळे करण्याकरितां ही पद्धत रूढ करावी लागली. पवित्र कुराणचा आधार घेतला तर चार स्त्रियांशी लग्न करण्याची आज्ञा दिली नसून तसे करण्याची परवानगी आहे असे आढळून येते. तशी परवानगी जरी असली तरी तिला जी अट लावली आहे ती पाहिली म्हणजे चार स्त्रियांशी विवाहबद्ध होणे तितके सोपें नाहीं असें दिसून येईल.

 " त्यांच्याशी सारख्या न्यायाने वागतां येणे शक्य नाही असें तुम्हांस वाटत असेल तर फक्त एक स्त्रीशींच लग्न करा.”

–पवित्र कुराणः ४:३