पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

१०५


कायदेशीर व संमत मानण्यात येतो. भावनेच्या भरात किंवा संतापांत एकाद्या स्त्रीचे जन्माचे नुकसान होऊ नये म्हणून तीन महिन्यांचा अवधी ठेवण्यात आला आहे. दोन महिन्यांत दोनदां घटस्फोट उच्चारल्यानंतर नवऱ्याला उपरति झाली किंवा त्याचे डोके थोडे शांत झाले तर पुन्हां दोघेही नवराबायको या नात्याने राहू शकतात व तो घटस्फोट रद्द होतो.
 पतीने पत्नीला दिलेल्या घटस्फोटास 'तलाख ' अशी संज्ञा आहे. त्याचे दोन प्रकार आहेत; एक " तलाख-इ-सुन्नत" व दुसरा " तलाख-इ-बिदत." पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे तीन महिन्यांच्या अवधीनंतर तीन वेळां घटस्फोटाची घोषणा केल्यामुळे जो घटस्फोट मंजूर होतो त्यास 'तलाख इ-सुन्नत' असें नांव आहे. कोणतीही मदत न घेतां एकदम तीन वेळां घटस्फोटाची घोषणा करितात त्यास " तलाख-इ-बिदत" असे म्हणतात. शेवटचा प्रकार अपवादात्मक समजला जातो. हजरत पैगंबरांच्या वेळी ओव्हमर नांवाच्या गृहस्थाने आपली पत्नी बदकर्म करीत असतां प्रत्यक्ष पाहिले व त्याने प्रक्षुब्ध होऊन एकदम घटस्फोट दिला. जारकर्मासारखा अक्षम्य गुन्हा प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहिल्यानंतर त्याने दिलेला घटस्फोट ' अपवाद ' म्हणून मान्य करण्यांत आला. या खेरीज ' तलाख-इ-बिदन 'चे दुसरे उदाहरण हदीसमध्ये दिसून येत नाही. असा अपवाद वगळून एकाद्याने एकदम घटस्फोट दिला तर तो कायदेशीर मानला जात नाही.
 दुर्दैवाने घटस्फोट परिपूर्ण झाला तर लग्नाच्या वेळी कबूल केलेली रकम ( मेहेर ) नवऱ्याला ताबडतोब द्यावी लागते. घटस्फोटाच्या वेळी ती स्त्री गर्भवती असेल तर तिला घराबाहेर न काढतां ती