पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

१०१


वास करणाऱ्या दुसऱ्या एकाद्या सद्गुणाबद्दल आपण प्रसन्नचित्त झाले पाहिजे. उदाहरणार्थ, एकाद्याची पत्नी तोंडाळ असं शकेल पण त्यामुळे नाराज न होतां, तिच्या प्रेमळवृत्तीकडे पाहून तिच्या पतीने प्रसन्न झाले पाहिजे.

"तुमच्या पत्नीला संतुष्ट राखा.”


–पवित्र कुराण ६६:१.


 आपली पत्नी दुःखीकष्टी होईल किंवा तिचे मन उद्विग्न होईल असें वर्तन आपण कदापिही करता कामा नये. आपला संसार सुखाचा व्हावा अशी सदिच्छा बाळगणारांनी पवित्र कुराणमधील वरील वाक्याचे काळजीपूर्वक मनन केले पाहिजे पत्नीचे समाधान, तिची संतुष्टवृत्ति हेच आपल्या सुखाचे अधिष्ठान आहे हे आपण कदापिही विसरूं नये. त्याचप्रमाणे इस्लामने आईचा दर्जा केवढ्या पराकोटीला पोहोंचविला आहे हे 'आईच्या पायाखाली स्वर्ग आहे' या वाक्यावरून मागील एका प्रकरणांत स्पष्ट झाले आहे.
 इस्लामने स्त्रीजातीबद्दल नुसता आदर व सहानुभूति बाळगून तिची बोळवण केली नाही तर तिच्या अभिजात हक्काबद्दल जागरूक राहण्याचा आदेश दिला आहे. सर्व जगांत स्त्रियांची उपेक्षा होत असतां, त्यांच्याभोंवतीं पारतंत्र्याचे पाश करकचून आवळले जात असतां, इस्लामने प्रथमच त्यांच्या स्वातंत्र्याचा, त्यांच्या हक्कांचा पाठपुरावा केला ही गोष्ट कदापिही दृष्टिआड होण्याजोगी नाही.
 " जितके पुरुषांचे हक्क स्त्रियांवर आहेत, तितकेच स्त्रियांचेही । पुरुषांवर आहेत.”

-पवित्र कुराण २:२२९