पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि संस्कृति




 निरनिराळ्या धर्मप्रवर्तकांनी प्रज्वलित केलेलें धर्मदीप विझू लागले, त्यांची तेजस्वी शिकवण निष्प्रभ होऊ लागली, त्यांच्या अवतारकार्यांची विस्मृती पडू लागली. जगाच्या उद्धाराकरितां, त्या महात्म्यांनी केलेली अविश्रांत मेहनत वायां चालली; मानवांच्या कल्याणाकरितां त्यांनी प्रस्थापित केलेली संस्कृती मातीच्या मोलाने विकू लागली; समाजाच्या स्वास्थ्याकरितां त्यांनी . घालून दिलेल्या नीतिनियमांची दिवसाढवळ्या पायमल्ली होऊ लागली. त्या वेळची एकंदर परिस्थिति पाहिली म्हणजे सारे जग अधःपाताच्या धारेस. लागले होते असा आपणांस निर्वाळा द्यावा लागेल.
 अपवाद म्हणून नांव घेता येईल असें एकही राष्ट्र नव्हते किंवा एकही देश नव्हता की ज्या राष्ट्रांत किंवा देशांत आबादीआबाद किंवा सुव्यवस्था होती. त्या काळी अगदी सुधारलेले राष्ट्र म्हणून ज्याचा उदोउदो चालला होता, त्या रोमन राष्ट्रांत तर जनतेच्या स्वातंत्र्याची बिनदिक्कत गळचेपी सुरू होती, गुलामांचा व्यापार राजरोस सुरू होता, गोरगरीब अक्षरश: नागविले जात होते.
 पर्शियामध्ये समाजव्यवस्था अत्यंत विस्कळित झाली होती. समाजाला योग्य वळण लावणारा कोणीही नेता उरला नव्हता. राजानें वाटेल ते अनन्वित अत्याचार केले किंवा अनिष्ट प्रथा पाडली तर त्याविरुद्ध ब्र काढण्याची सोय नव्हती. मेझदकनें अनेक लाजिरवाणे रिवाज सुरू केले पण त्याचा निषेध करावयाचे धाडस कोणासही होत नसे. स्त्रीपुरुषांच्या एकत्र मैफिली बोलवावयाच्या, पुरुषांना दारू पिऊन धुंद करावयाचे आणि त्यांच्याकडून स्त्रियांची विटंबना चालू झाली म्हणजे ते दृश्य पाहण्यांत आनंद मानावयाचा निंद्य प्रघात त्याने पाडला होता. नवपरिणत वधूला गुरूच्या सेवे-