पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इस्लाम आणि संस्कृति
प्रकरण १ लें
इस्लामपूर्व जग

  “सर्व बहुजन समाज अगतिक व अवश झाला होता. त्या स्थितीतून त्याला वर काढण्यासाठी क्रांति घडवून आणण्याचे यशस्वी कार्य इस्लाम धर्माने केले आहे; आणि त्यामुळेच इस्लामी धर्माचा प्रभाव व यश आश्चर्यावह ठरले आहे."

-मानवेंद्र रॉय.

 पांचवें आणि सहावें शतक म्हणजे जगाच्या राशीला लागलेल्या साडेसातीचा काळ ! या दुर्धर काळांत अखिल जगामध्ये अन्याय, अनाचार आणि बेबंदशाहीला नुसता ऊत आला होता. जिकडे पहावें तिकडे स्वातंत्र्याची मुस्कटदाबी, सदाचाराची अवहेलना आणि सद्विचाराची होळी चालली होती. बलिष्ठांनी अनाथांवर अत्याचार करावेत, श्रीमंतांनी गरिबांना भरडून काढावें, राज्यकर्त्यांनी आपल्या प्रजाजनांवर दडपशाहीचा वरवंटा फिरवावा, धनिकांनी गुलामांना पशंप्रमाणे वागवावें, पुरुषांनी स्त्रियांची विटंबना करावी, पुरोहित वर्गाने धर्माच्या नांवावर अनन्वित व अमानुष कृत्ये करावीत असे हृदयविदारक प्रकार जगामध्ये राजरोस चालले होते.