पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
इस्लाम आणि संस्कृति


वागविण्यांत आले पाहिजे. स्त्री ही बटीक किंवा उपभोग्य वस्तु नव्हे. सर्वांच्या आदरास पात्र होणारी ती सहृदय व त्यागी व्यक्ति आहे. स्त्री म्हणजे मांगल्याचे मूर्तिमंत प्रतीक, मार्गदर्शन करणारी तेजस्वी शलाका, मानवी जीवनांत आनंद निर्माण करणारी शक्ति, धोक्याचा इशारा देणारा दीपस्तंभ या व अशा ओथंबलेल्या भावनांनी स्त्रीजातीकडे पाहण्यास इरलामने प्रवृत्त केलें; आई, स्त्री आणि कन्यका या तिन्ही स्वरूपांत मानवजातीस उपकृत करणाऱ्या स्त्रीजातीशी प्रेमळपणाने वागणे हे आपले कर्तव्य आहे अशी जाणीब करून दिली. पवित्र कुराणांत 'अन्-निसा' नांवाचा संपूर्ण अध्याय खर्ची पडला आहे, यावरून स्त्रीजातीचें इस्लामला केवढे महत्त्व वाटते हे सिद्ध होण्यासारखे आहे. पुरुषसत्तेची जबरदस्ती किंवा स्त्रियांची अवहेलना यांना पवित्र कुराणांत स्थान नाही. स्त्रियांशी प्रेमळपणाने व दयार्द्रतेने वागण्याचा वारंवार आदेश देण्यांत आला आहे. त्यांच्या अभिजात हक्कांविषयीं सदैव जागरूक राहण्याच्या आज्ञा दिलेल्या आहेत. स्त्रीपुरुषांमधील संबंध प्रेम, सहानुभूति आणि समतेच्या पायावर उभारलेले असले पाहिजेत असें आग्रहाने प्रतिपादन करण्यांत आले आहे.
 " स्त्रियांशी प्रेमळपणाने वागा; तुम्ही त्यांचा द्वेष कराल तर परमेश्वराने ज्यामध्ये मांगल्य निर्माण केले आहे अशा व्यक्तीचा तिरस्कार केल्यासारखे होईल.”

-पवित्र कुराण ४:१९


 स्त्रियांशी तुसडतेने वागणे, त्यांना घालून पाडून बोलणे, उठल्या सुटल्या त्यांच्या जिव्हारी लागेल अशा प्रकारची अभद्र भाषा किंवा शिवीगाळ करणे इस्लामने धर्मबाह्य ठरविले आहे. स्त्रीजात निर्माण