पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
इस्लाम आणि सस्कृति


गळून पडले. आज कित्येक वर्षे दृढमूल झालेली ही अमानुष पद्धत नष्ट झाली. समाजसंस्थेला पोखरून टाकणारी ही कीड निघून गेली. समाजाच्या पायदळी तुडविला जाणारा हा वर्ग समाजाच्या बरोबरीने वागू लागला, त्याला मानाचे स्थान मिळू लागले; कुटुंबांतील मंडळीशी समरस होऊ लागला. इस्लामने मानवतेवरील गुलामगिरीचा कलंक धुऊन टाकला. गुलामांचें हृदयद्रावक वर्णन करणारा ग्रंथकार, त्याच गुलामांचें इस्लाममध्ये स्थान काय आहे याचे विवेचन करतांना लिहितो, " इस्लाममध्ये आजचा गुलाम उद्या मुख्य प्रधान झालेला दिसून येईल. तो आपल्या धन्याच्या मुलीशी लग्न करू शकतो आणि त्या काबाचा प्रमुख म्हणून वावरूं शकतो. गुलाम म्हणविणाऱ्यांनी राज्ये प्रस्थापित केली आहेत आणि राजवंश चालं केला आहे. महंमद गझनीचा बाप गुलाम होता हे सर्वश्रुत आहे. ख्रिश्चन धर्मांत अशी उदाहरणे दाखवून देतां येतील काय ? किंवा गुलामाबद्दल दाखविलेली अशी माणुसकी इतिहासामध्ये आपणांस कोठेतरी आढळून येईल काय ? "

 इस्लामचा प्रसार ज्या ज्या प्रदेशांत झाला, त्या त्या ठिकाणी गुलामगिरी नष्ट झालेली आपणांस दिसून येईल. जोसेफ थॉमसन नांवाच्या प्रसिद्ध प्रवाश्याने लंडन टाईम्स' मध्ये आपला प्रवासवृत्तांत लिहितांना काढलेले उद्गार किती तरी अर्थपूर्ण आहेत. तो लिहितो, “ माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मी असें ठासून सांगतों की ज्या भागांत इस्लामचा प्रसार झाला नाही, त्या ठिकाणींच गुलामांचा व्यापार अद्यापही चालू असलेला दिसून येतो."