पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामचे कार्य झाले होते. परंतु सीरिया, मेसँपोटेमिया व इराण जिंकल्यावर त्यांनी चिनी व्यापार तर हस्तगत केलाच. पण त्याचा प्रवाह स्वतःचे आफ्रिकेतील प्रदेशांतून पश्चिम युरोपांतील बाजारपेठेकडेही वळविला. आठवें ते अकरावे शतक या काळांत एकीकडे चीन, हिंदुस्थान व दुसरीकडे यूरोप येथील बहुतेक सर्व व्यापार अरबांच्या हातांत होता. हिंदुस्थान आणि चीन ते मोरोक्को व स्पेन येथपर्यंत आपल्या उंटावर उंची माल घेऊन हजारों अरब प्रवासी हिंडत असत. त्यांचा कोठेही तिरस्कार किंवा छळ होत नसे. ते राज्यकर्त्यांच्या वर्गातले होते. म्हणूनच त्यांच्या संस्कृतीवर व तत्त्वज्ञानावर विचार, विकास आणि विश्वबंधुत्व यांचा ठसा उमटलेला असे. त्यांची शिकवण साम्राज्याच्या भरभराटीबरोबरच वृद्धिगत होत होती. त्यांच्या शिकवणीला अंधश्रद्धेने अंध केले नव्हते. लष्करी सरदारशाही आणि मत्सरी पुरोहित यांचे प्राबल्य असल्याने मानवी तत्त्वज्ञान प्रामाण्यरूप गूढवादी बनते. तत्त्वज्ञान-विश्वाच्या उत्पत्तिविकासाच्या बुद्धिग्राह्य स्पष्टीकरणाचा शोध व्यापारी युगांतच प्रथम निर्माण होतो. ग्रीकांच्या गांवराज्यांत म्हणूनच प्रथम तत्वज्ञानाचे बीजांकुर फुटू लागलेले दिसतात. इस्लाम म्हणजे इतिहासाचे फल व मानवप्रगतीचे एक साधन होय. नव्या सामाजिक संबंधांचे ध्येयरूपाने त्याचा उदय झाला आणि त्याच्या योगाने मानवी मनोविकासांत क्रांति करून टाकली. इस्लामधर्म जसा जुन्याचे स्थान बळकावून आला त्याप्रमाणे नव्या स्थितीमध्ये नव्या धन्याच्या अंगावर विकासाचे कार्य सोंपवून त्यासही जाणे प्राप्त झाले. सामाजिक क्रांतीची नवीं साधनें निर्माण करण्याला त्याने मदत केली हे खरे. प्रायोगिक विज्ञानशास्त्र आणि विचारप्रधान तत्त्वज्ञान हीच ती साधने होत. या साधनांनी नव्या सामाजिक क्रांतीची प्रगति घडविली. हीच इस्लाम धर्माची सर्वांत मोठी जमेची रक्कम. ४९