Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना



आपली अडचण कांहीं सांगितली नाहीं. मी एके दिवशी जेवणाचे वेळीं हजर होतों तेव्हां प्रत्येकानें कोरड्या पोळ्या खाल्लेल्या पाहिल्या. मी हें पाहून थिजलों. त्याच वेळीं सहँटस् ऑफ इंडिया सोसायटीचे श्री. वझे यांच्या ही गोष्ट लक्षांत आली व त्यांनीं श्री. हृदयनाथ कुंझरू यांचेकरितां शिजत असलेल्या उकडलेल्या भाज्या रोज आणून देण्याचें ठरविलें. तेव्हापासून आम्ही खानावळ बंद करून डबलरोटी व त्याच्या बरोबर लागणारे पदार्थ इराण्याच्या हॉटेलमधून आणून देत होतों.
 मला वाटत होतें कीं, रॉय यांचा स्वभाव मोठा कारस्थानी व संशयी असेल. पण या बाबतींत निराळाच अनुभव आला. कोणत्याही माणसाच्या बाबतीत तो प्रामाणिक आहे, असें ते गृहीत धरून चालतात. त्यांना अनेक बाबतींत विश्वासांतील कांहीं माणसांनीं फसविलें आहे. ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली असता त्यांस आश्चर्य व दुःख वाटले नाहीं. ते एकदां म्हणाले कीं, हाती आलेल्या व्यक्तींचा जास्तींत जास्त देशकार्यात उपयोग करून घ्यावा. त्याकरिता लहान मोठ्या कामांची क्रमानें जबाबदारी टाकत जावी. त्यांत विपरीत अनुभव आला तर त्या व्यक्तीस बाजूला टाकावें. याशिवाय दुसरा उपाय नाहीं. कामाची क्रमानें जबाबदारी टाकणें हीच व्यक्तिपरीक्षेची कसोटी आहे. संशयापेक्षां सावधपणाच व्यवहारांत जास्त उपयोगी पडतो.
 वादविवादांत महत्त्वाच्या मुद्यांचें थोडक्यांत उत्तर देण्याची रॉय यांची हातोटी पाहून पुष्कळ वेळां म. गांधींची आठवण होते. महात्माजींच्या ठिकाणीं मूळ मुद्याचें अगदीं थोडक्यांत उत्तर देण्याची कुशलता आहे. रॉय हे वादविवादाचे वेळीं शुष्क घासाघिशीत पडत नाहींत. महत्त्वाच्या मुद्यांचा व उपपत्तींचा उल्लेख करतात. एवढ्यानें चर्चा करणाराचें समाधान न झाल्यास किंवा हेकेखोर प्रतिवादी असल्यास वाद संपवितात. रॉय यांचेपासून जिज्ञासू वृत्तीनें चर्चा करणायास गहन प्रश्नांची गणिती पद्धतीची सुस्पष्ट उपपत्ति प्राप्त होते.

१९