पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य

ऐतिहासिक संगति दाखवून दिली; त्याकरितां बुद्धकालीन सामाजिक स्थित्यंतरांची माहिती सुनावली; व इ. स. पूर्वी दुस-या शतकांत ब्राह्मणवर्चस्वानें बौद्ध क्रांति विफल कशी केली व त्याचा तत्त्वज्ञानावर काय परिणाम झाला, याचें विवरण केलें. मला वाटलें कीं, यांच्याजवळ प्रो. राधाकृष्णन्पेक्षां वरच्या दर्जाची हिंदी तत्त्वज्ञानाच्या इतिहासांत भर घालण्यासारखी महत्त्वपूर्ण शास्त्रीय उपपत्ति आहे.
 इ. स. १९३७ च्या जुलै महिन्यांत रॉय पुणे येथें महिनाभर राहिले होते. त्या वेळीं त्यांचा भरपूर सहवास घडला. मला त्यांचें खाजगी जीवन युरोपियन मजुरासारखे दिसलें. 'युरोपियन' म्हणण्याचें कारण त्यांच्या आयुष्यातील मोठा भाग युरोपियन संस्कृतीत गेल्यामुळें राहणींत युरोपियन संस्कार दिसून येतो. ' मजूर' म्हणण्याचें कारण ते अत्यंत अकिंचन आहेत, व ते अविश्रांत श्रम करीत असतात. ते अलीकडे आजारी आहेत, तरीही काम फार करीत असतात. काम करीत असतां एकदां बैठक मारली म्हणजे चार चार तास निघून जातात. सौ. एलन रॉय यांचा टाइपरायटर खंड न पडतां चार चार तास सुरू असतो. मध्यें चहा, जेवण व थोडा वेळ विश्रांति झाल्यावर पुनः तोच कार्यक्रम सुरू. दोघे मिळून स्वयंपाक करतात. रॉय हे। मिताहारी आहेत. काय खावें व काय प्यावे याची चर्चा करणें त्यांस आवडत नाहीं. त्या बाबतींत गरीबानें चर्चा करून उपयोग नाहीं,असें त्यांचे म्हणणें आहे. गरिबास मिळेलं तेंच खाणें भाग आहे. सकाळीं सातपासून रात्रीं ११ पर्यंत निरनिराळ्या कार्यक्रमांत रॉय गढलेले असतात. रॉय हे १९३७ जुलैमध्ये पुण्यास सव्र्हटस ऑफ इंडिया सोसायटीत राहिले होते. तेव्हा माझ्या मित्राने त्यांचा पुणे येथें राहण्याचा खर्च केला. मराठी ब्राह्मणाच्या खाणावळींतून अन्न पोचवीत असतां तिखट मसाल्याची श्री. रॉय व सौ. रॉय या दोघांसही संवय नसल्यामुळें त्यांना तीन चार दिवस जवळ जवळ उपवास पडला. मी व इतर मित्र रोज भेटीस जात होतो. पण या गृहस्थांनी

१८