Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इच्छा होते. भरलेले मेघ आणणारे वारे, ईश्वराच्या करुणेचे जणुं ते अग्रदूत- सृष्टीतील विविधतेमधील मेळ पहा, तींतील एकता पहा. मानवजातींत हि विविधता आहे व सदृशता, एकताहि आहे. फुले, फळे, हे प्राणी, मानव या सर्वांवरून, या चराचर सृष्टीवरून कोणी तरी एक सर्वश्रेष्ठ महान् परमेश्वर आहे असें नाहीं का दिसत?"
 असें मुहंमद सांगत, विचारित. चमत्कारांवर भर न देतां ते बुद्धीवर भर देतात. विचाराला चालना देतात. भोळसरपणावर जोर देणारे ते नव्हते. प्रज्ञेचा डोळा त्यांना प्रिय होता. बुद्धीचा महिमा ते जाणत. पैगंबरांनाहि सारी सृष्टि ईश्वराचे अस्तित्व पुकारणारी असें वाटे. सर्वत्र ईश्वरी चमत्कार ! सारी सृष्टि परमेश्वराचा महिमा जणुं मुक्यानें गात आहे.

जिव्हा प्रत्येक पानांत । ध्वनि प्रत्येक निर्झरीं
सर्वत्र घुमते वाणी । वाऱ्यावर धरेवरी
निरभ्र गगनीं आहे । महान् पूरामधें असे
सर्वत्र ईश्वरी वाणी । नावेक न विसांवते ॥

 अद्वितीय केवळ एक अशा ईश्वराचा हा आचार्य सृष्टीचाहि आचार्य आहे. त्या एकेश्वराचा हा पैगंबर सृष्टीचाहि पैगंबर आहे. विश्वांत सर्वव्यापी नियम आहे, व्यवस्था आहे, ऋतसत्य आहे, एक चिच्छक्ति सर्वत्र भासत आहे, एक संकल्पशक्ति, नियामक, विश्वशासक, विश्वमार्गदर्शक अशी आहे, असें पैगंबर सांगत आहेत. आणि सर्वांत मोठा चमत्कार कोणता? मुहंमद सांगतात "निसर्गाची, सदसद्विवेकबुद्धीचीं, भविष्यासंबंधीची जीं दैवी सत्यें संस्फूर्त वाणीनें सागितलीं गेलीं, ज्याचें हें कुराण बनले, त्या कुराणाहून अधिक मोठा चमत्कार कोणता?" मुहंमद विचारतात, "अरे अश्रद्धावंतांनो ! तुमच्या या सामान्य भाषेत जगांतील असे अद्वितीय पुस्तक प्रकट व्हावें, ज्यांतील लहानसा भागहि सोन्यानें मढवून ठेवलेल्या तुमच्या सर्व पद्यांना व गीतांना लाजवील, असें हें कुराण- त्या परमेश्वराच्या विश्वव्यापक करुणेची मंगल वार्ता देणारें, अहंकारी घमेंडनंदनांना, जुलमी जालिमांना धोक्याची सूचना देणारें, असें हें कुराण. त्याहून थोर चमत्कार कोणता?"

इस्लामी संस्कृति