Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 स्वतःभोंवतीं दिव्य तेजोवलय निर्माण व्हावें असें मुहंमदांस कधीं वाटलें नाहीं. ते नेहमी सांगत, "देवाच्या शब्दांचा मी संदेशवाहक. मी पाईक. तो मला बोलवतो, मी बोलतों. माझ्याद्वारां प्रभु आपला संदेश देत आहे." मुहंमद मानवांच्या पूजेविरुद्ध होता. ईश्वरासमोर अत्यंत नम्रपणें व सरळपणे ते उभे आहेत. अत्यंत साधेपणा त्यांच्या जीवनांत होता. अत्यंत भावनामय प्रसंगींहि अहंता त्यांना शिवत नसे. केवळ मधुर कृतज्ञता व नम्रता त्यांच्या हृदयांत भरलेली असे. मुहंमद एके ठिकाणी म्हणतात:
 "दयाळु परमकृपाळू परमेश्वराच्या नांवाचा जयजयकार असो. या पृथ्वीवर वा त्या स्वर्गात जें जें आहे तें तें सारें परमेश्वराची स्तुति करते. सारें चराचर त्या प्रभूचें स्तोत्र गात आहे. तो परमेश्वर पवित्र आहे. अत्यन्त शक्तिमान् आहे. सर्वज्ञ आहे. तो एक आहे, अद्वितीय आहे. स्वतःची सामक्षा दाखविण्यासाठी अज्ञानी अरबांत त्यानें पैगंबर पैदा केला आहे. अरबांना धर्मग्रंथ व ज्ञान देण्यासाठीं, विशुद्ध करण्यासाठीं त्यानें पैगंबर पाठविला आहे. अरब पूर्वी अज्ञानांत होते. परंतु ईश्वराची दया सर्वांठायी आहे. ती मुक्त आहे. इच्छा त्याची असेल तेथें तो आपली दया पाठवितो. ईश्वर परम दयाळु आहे. आणि त्या परमेश्वराचे चमत्कार या निसर्गात सर्वत्र भरून राहिले आहेत पहा, आसमंतांत पहा. हे आश्चर्यमय जगत् पहा. पहा हे चंद्र, सूर्य, तारे. अनंत निळ्या आकाशांत कसे नियमितपणें आपल्या गतीनें जात आहेत. या विश्वांतील व्यवस्था पहा, कायदा पहा, पद्धती पहा. सुकलेल्या धरित्रीला हिरवी गार करणाऱ्या या पावसाच्या सरी बघा. कसे मोत्यासारखे हे जीवनदायी थेंब. आणि प्रचंड महासागरावर डौलाने जाणारीं तीं गलबते पहा. मानवांचा फायद्याचा असा माल नेतात आणतात. आणि ही खजुराने लादलेली झाडें पहा. ती ताडगोळ्यांनी भरलेलीं ताडाची झाडे पहा. अशी ही महान् सृष्टि त्या तुमच्या दगडाधोंड्यांतील देवाने का निर्मिली? त्या लांकडी मूर्तींनी का निर्मिली? तुम्हांला चमत्कार हवे आहेत. जेथें पहाल तेथे चमत्कार! सारी सृष्टि ईश्वराच्या सामक्षांनी भरलेली आहे. हें शरीरच पहा. किती व्यवस्थित व सुंदर. आश्चर्यकारक गुंतागुंतीनं भरलेलें. परंतु कसें दिसतें. आणि दिवसरात्रीची ही अभंग शाश्वत जोडी पहा. जीवनमरणहि पहा. तुम्ही झोंपता व जागे होता हाहि चमत्कार नाहीं? ईश्वरानें जें विपुल दिलें आहे तें जमवावे अशी तुम्हांला
७० ।