Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंतु जेव्हां एखादा प्रश्न उद्भवतो, तेव्हांच आपली बुद्धि जागते. आपला दैनंदिन सामान्य व्यवहार म्हणजे आपल्या ठरीव संवयींचा, आपल्या लहरींचा, वासना विकासांचा परिणाम असतो. बुद्धि दरक्षणीं येत नाहीं. बुद्धि देवता ही मागून येते. संवयींना बुद्धीनें सुसंस्कृतपणा आला असेल. परंतु तेयें बुद्धि असतेच असें नाहीं, बुद्धि नेहमी मागे राहाते, आणि संवय, आपले रागद्वेष आपल्या आवडीनावडी यांनाच अग्रस्थान असतें.
 जसें व्यक्तीचें तसेंच समाजाचेहि. समाजसुद्धां संवयी, रूढि, रागद्वेष यांनींच वागतो. म्हणून समाजांतील रूढि, आवडीनावडी, दंतकथा, भावना, वासनाविकार या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. बुद्धिवादाइतकीच त्यांच्या अभ्यासाचीहि जरूरी असते. समाजाचा इतिहास बुद्धीपेक्षांहि रूढि व दंतकथा यांनीं अधिक बनवला आहे. इतिहास पाहणाऱ्याने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतां कामा नये. शास्त्रज्ञाला सोनें किंवा खडू सारख्याच किंमतीची. विचाराच्या तत्त्वज्ञानाच्या उच्च स्वरूपांचा अभ्यास जसा महत्त्वाचा तद्वत् अंधविश्वास, चालीरीति, भोळसट कल्पना, लोकरूढि, दंतकथा यांचा अभ्यासहि महत्त्वाचा. मानवी जीवनावर या सर्वांचा कसकसा परिणाम होतो हे पाहिले पाहिजे.
 मानवी समाजाचा अभ्यास तीन रूपांत करायचा असतो.
 १. भौतिक, भौगोलिक, आर्थिक स्वरूपांत,
 २. भावनात्मक स्वरूपांत,
 ३. बौद्धिक स्वरूपांत.
 मानवी सुधारणेचा विचार करतांना बाह्य जीवन, कलात्मक जीवन, वैचारिक जीवन या तिहींचा विचार करावा लागतो. आणि उत्क्रान्तीच्या वा क्रांतीच्या दृष्टीनें करावा लागतो. चौथीहि एक गोष्ट असते. ती म्हणजे आध्यात्मिकता. आपल्या वरील त्रिविध जीवनाचे सार म्हणजे आपली आध्यात्मिकता. म्हणजे भौतिक, भावनात्मक व वैचारिक गोष्टींचा आपल्या मनावर होणारा परिणाम. कोणी म्हणतात की वैचारिक स्वरूपांत ही गोष्ट येऊन गेली. परंतु वैचारिक जीवनाच्याहि पलीकडे जाणारी आध्यात्मिकता असते.
 संस्कृतीचा भौगोलिक व आर्थिक परिस्थितीशी फार निकट संबंध असतो. आपलाच हेका धरणारे अंध लोक कांहीं म्हणोत, मनुष्य हा परिस्थितीचा

इस्लामी संस्कृति । ३