Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तरीहि सार्वजनिक प्रार्थना ते चालवीत. प्रार्थना म्हणजे त्यांचे अमृत होतें. मरणाच्या आधीं तीन दिवसपर्यंत हे काम ते करीत होते. शेवटचे तीन दिवसच हे काम त्यांनी केलें नाहीं. अबुबकर करीत.
 एके दिवशीं मध्यरात्रीं ते उठले. जेथें त्यांचे जुने दोस्त, जुने साथीदार मरून पडले होते, त्या कबरस्थानांत ते गेले. त्या कबरांना ते भेटले. त्या त्या कबरीजवळ बसून मुहंमद रडले. ते सारे प्रसंग, त्या लढाया त्यांना आठवलें. तें कृतज्ञतेचं, प्रेमाचें श्राद्ध होतें. ती पवित्र तिलांजलि होती. किती सहृदय प्रसंग! कसें कोमल व प्रेमळ मन! आपापल्या कबरीत शांतपणे विश्रांति घेणाऱ्या त्या मित्रांना परमेश्वराने अशीर्वाद द्यावा म्हणून पैगंबरांनी प्रार्थना केली आणि नंतर घरी परत आले.
 आजारीपणांत आयेषेच्या घरी ते रहात. कारण तें घर मशिदीच्या जवळ होतें. जोपर्यंत शक्ति होती. तोपर्यंत ते प्रार्थना चालवीत. परंतु झपाट्यानें शक्ति क्षीण होत होती. एके दिवशीं अली व अब्बासांचा मुलगा फजल यांच्या आधाराने ते प्रार्थनेला आले. यानंतर मशिदींत ते आले नाहींत. मशिदींतील शेवटचें आगमन! असें सांगतात कीं त्या दिवशी त्यांच्या मुद्रेवर अनिर्वचनीय असें मंद स्मित झळकत होतं. त्या दिवशी सभोंवतीचे सारे बोलले, "किती सुंदर आजचं तुमचें स्मित, किती प्रसन्न व प्रेमळ ही मुद्रा!" कुराणांतील प्रार्थना, स्तुति वगैरे सारें म्हणून झाले. आणि शांतपणे पैंगंबर म्हणाले, "मुस्लिमांनो, कोणाच्या बाबतीत माझ्याकडून कांहीं अन्याय झाला असेल तर सांगा. येथें त्याचे उत्तर द्यावयास मी उभा आहे. तसेच जर मी कोणाचें कांहीं देणें असेन तर माझें जें कांहीं कदाचित् असेल ते सारे तुमचेच आहे."
 एकजण उठून म्हणाला, "तुमच्या सांगण्यावरून मी एकदा कोणाला तरी तीन दिरहम दिले होते."
 पैगंबरांनी लगेच त्याचे तीन दिरहम दिले व म्हणाले, या जगांत मान खालीं घालावी लागली तरी हरकत नाहीं. परंतु परलोकीं प्रभूसमोर खाली मान नको!" सारें शांत झालें. पैगंबरांनी पुन्हां प्रार्थना केली. जे हजर होते, जे शत्रूच्या छळामुळे मारले गेले होते त्या सर्वोसाठी ईश्वराची कृपा त्यांनी

इस्लामी संस्कृति । १४३