Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतःस पैगंबरहि म्हणवूं लागले. हे पैगंबर आपापल्या जातिजमाती आपल्याकडे ओढूं लागले. यमनचा एक पुढारी फारच गडबड करूं लागला. तो श्रीमंत व धूर्त होता. जादूगार होता. कांही जादूचे चमत्कार करी. त्यानें आपल्याभोवती तेजोवलय निर्माण केलें. भोळेभाबडे लोक भोवती जमवून आसपासचा मुलुख तो जिंकूं लागला. त्याचे नांव उबय इब्न काब असें होतें. परंतु अल अस्वद या नांवानेंच तो प्रसिद्ध आहे.
 या वेळेस सहर हा यमनचा गव्हर्नर होता. सहरच्या बापाचं नांव अबाझान. हा पूर्वी इराणचा गव्हर्नर होता. अबाझानने पुढे इस्लामी धर्म स्वीकारला. अबाझानचे त्या प्रांतांत फार वजन होतं. त्याच्यामुळे यमनमधील अरबच नव्हे तर इराणीहि मुस्लिम झाले. अबाझान मरण पावल्यावर त्याचा मुलगा सहर याच्याकडेच पैगंबरांनी प्रांताधिपत्व ठेविलें होतें.
 अल अस्वदनें सहरला ठार केलें. त्याच्या पत्नीशी बळजबरीनें निका लावला. तिचे नांव मर्झबान होतें. मर्झबानने एका इराण्याच्या साहाय्यानें अल अस्वद दारूंत असतां त्याचा खून केला!
 तुलेह, मोसैलिमा हे आणखी दोघे तोतये पैगंबर उभे राहिले होते. अबु बकरने त्यांची बंडाळी मोडली. मोसैलिमानें तर मुहंमदांस संदेश धाडिला : "देवाचा पैगंबर मोसैलिमा याजकडून देवाचे पैगंबर मुहंमद यांस, सलाम. तुमच्या पैगंबरीमध्यें मी भागीदार आहे. आपणा दोघांत पैगंबरी सत्ता वाटली गेली पाहिजे. निम्मी पृथ्वी मला, निम्मी तुम्हा कुरेशांना. परंतु तुम्ही कुरेश बळकावणारे आहांत. तुमच्याजवळ न्याय नाहीं."
 मुहंमदांनी या पत्रास पुढील खणखणीत जबाब पाठविला :
 "कृपावंत मेहेरबान परमेश्वराच्या नांवें : पैगंबर मुहंमदाकडून मोसैलिमास : जे सत्यमार्गानं जातात त्यांना शांति असते. पृथ्वी ईश्वराच्या मालकीची. प्रभूची ज्याच्यावर कृपा होते त्याला तो ती देतो. ईश्वराला जे भिऊन वागतात त्यांचा भविष्यकाळ असतो. त्यांची भरभराट होईल."
 पैगंबर अशा रीतीनें कामकाज पहातच होते. परंतु आतां थकले. प्रकृति फारच बिघडली. अखेरचे दिवस आले. ते अत्यन्त शान्त व गंभीर झाले. त्यांच्या अंतःकरणांत 'निर्वाणपर शांति' उचंबळत होती. अशक्त झाले होते
१४२ ।