"तसेंच तुमच्यावर कोणी विश्वास टाकला तर विश्वासघात करूं नका. दिला शब्द पाळा. पाप टाळा. सावकारी निषिद्ध आहे, व्याजबट्टा वर्ज्य आहे, हें ध्यानांत धरा. पैसे उसने घेणाऱ्याने घेतले तेवढे परत करावे. व्याज देऊ नये. मुद्दलाची फेड व्हावी. माझ्या मंडळींपासूनच याची अंमलबजावणी सुरू होईल. चुलते अब्बास ऋणकोपासून मुद्दल तेवढेच घेतील.
"आणि प्राचीन काळापासून तुम्ही जाहिलियत मानीत आलेत. रक्ताचा सूड घेत आलेत. खुनाचा बदला घेत आलेत. परंतु आजपासून तें बंद होत आहे. ही गोष्ट निषिद्ध आहे. इस्लाममान्य नाहीं. आजपासून सारी सूडाची भांडणे रद्द झाली समजा. हारीसाचा मुलगा इब्न रबिया यांचा खून झाला. परंतु त्याचा सूड घेण्यांत येणार नाहीं. माझ्याच आप्तेष्टांपासून हा नवीन नियम सुरू करूं या. (इब्न रबिया लहान असतां दुसऱ्या जमातीच्या ताब्यात संरक्षणार्थ देण्यांत आला होता. परंतु हुझैल जातीनें त्याचा क्रूरपणे वध केला होता. मुहंमदांचा हा चुलतभाऊ होता.) इब्न रबियाच्या या उदाहरणानें आपण नवीन आरंभ करूं या.
"आणि तुमचे गुलाम. त्यांना नीट वागवा. तुम्ही खाल तेंच त्यांनाहि खायला द्या. तुम्ही कपडे घालाल तसेच त्यांना द्या. अक्षम्य असा अपराध त्यांनी केला तरच त्यांना सोडा. लक्षांत ठेवा की कसेहि झाले तरी तेहि खुदाचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेनें नाहीं वागवतां कामा.
"मित्रांनो, माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या. सारे मुसलमान एकमेकांचे भाऊ आहेत हें कधींहि विसरू नका. तुमचें सर्वांचें एक जणुं भ्रातृमंडळ, एक तुमचा महान् भ्रातृसंघ. जे दुसऱ्याचें आहे तें त्यानें स्वछेनें खुशीनें दिल्याशिवाय त्याला हात लावू नका. अन्यायापासून व अन्याय करणाऱ्यापासून दूर रहा, सावध रहा.
"जे येथे आज हजर आहेत त्यांनी हें सारे गैरहजर असणाऱ्यांस सांगावें. येथें ऐकणाऱ्यापेक्षांहि ज्याला सांगितले जाईल तो कदाचित् तें अधिकच लक्षांत ठेवण्याचा संभव आहे."
असें हें प्रवचन बराच वेळ चाललें होतें. साधें, सरळ, कळकळीचे, वक्तृत्वपूर्ण असें तें प्रवचन होतें. भावनाप्रधान श्रोत्यांचीं अंतःकरणें उचंबळत होतीं, थरारत होतीं. आणि प्रवचन संपल्यावर, पैगंबरांनी पुढील शब्दांनी शेवट केला :
इस्लामी संस्कृति । १३९