म्हणे, "तूंहि मुसलमान हो. वितुष्टें वाढवूं नको. काव्यशक्ति द्वेष पसरवण्यांत खर्चू नकोस. खऱ्या धर्माची निंदा नको करूस." एकदां काब गुप्तपणें मदिनेंत आला. ज्या मशिदींत पैगंबर प्रवचन करीत होते तेथें तो गेला. पैगंबरांच्या भोंवतीं भक्तिप्रेमानें श्रोते बसले होते, उपदेशामृत पीत होते. हेच ते पैगंबर असें काबने ओळखले. तो एकदम पुढे हसून म्हणाला : "पैगंबराच्या प्रेषिता, तुझा तिरस्कार करणारा कवि काब मुसलमान होऊन जर तुझ्यासमोर येऊन उभा राहिला तर तूं त्याला क्षमा करशील?"
"हो करीन." पैगंबर म्हणाले.
"तर मग मीच तो काब!"
मुहंमदांच्या जवळचे लोक त्याच्या अंगावर एकदम धांवले. परंतु पैगंबरांनी सर्वांना शांत केले. ते म्हणाले, "मी त्याला क्षमा केली आहे. त्याच्या केसालाहि धक्का लागतां कामा नये." काबचे कविहृदय उचंबळले. त्याने विचारलें, "पैगंबर, मी एक कसीदा म्हणूं, पवित्र सुंदर काव्य म्हणूं?" पैगंबर कवींना उत्तेजन देत नसत. परंतु या वेळेस त्यांनी परवानगी दिली. काबने स्वतःची एक कविता म्हटली. अरबी भाषेतील ती उत्कृष्ट कविता आहे. तें एक प्रेमगीत होते.
कवि आपली प्रियकरीण जी सुआद तिच्या वियोगाची दुःखकथा सांगत आहे. "माझी प्रिया मला सोडून गेली. माझें हृदय जळत आहे, झुरत आहे, मी दुःखी कष्टी आहें. अशान्त आहे. कशी आग शमवूं? कसें हृदय शान्त करूं? माझी लाडकी गोड सुआद कोठे आहे ती? तिच्या पाठोपाठ तिचा बंदा बनून मी रानोमाळ भटकत आहें. कोठे आहे ती? कसें अवर्णनीय तिचे सौंदर्य, किती मृदुमंजूळ वाणी, कसा गोड तिचा गळा! सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे तिचें हसणे, प्रसन्न व मोहक स्मित!" अशी कविता चाललेली असते आणि काब एकदम विषयान्तर करतो. तो पूर्वी सुआदसाठी वेडा होता. आतां मुहंमदांसाठी होतो. नवधर्माचा तो महान् कवि होतो. या महान् विषयांत शिरतो व उदात्त काव्य निर्मू लागतो. सारे तन्मय होतात. आणि काव्यांतील परमोच्च शिखर येतें :
"जगाला प्रकाश देणारी महान् मशाल म्हणजे हे मुहंमद! जगांतील सारे पाप नष्ट करणारी प्रभूची तरवार म्हणजे हे मुहंमद!!"
इस्लामी संस्कृति । १३१