हातीमच्या मुलीचें नांव सुफाना असें होतें. ती पैगंबरांस म्हणाली : "हे परमेश्वराच्या प्रेषिता, माझा बाप आज जिवंत नाहीं. मला एकच भाऊ परंतु तोहि आज दऱ्याखोऱ्यांत पळून गेला आहे. मी स्वतः खंडणी भरून मुक्त होऊं शकत नाहीं. तूं उदार हृदयाचा आहेस. मला स्वतंत्र कर. माझा पिता विश्वविख्यात होता. तो आमच्या जमातीचा नेता होता, राजा होता. तो कैद्यांची खंडणी भरून त्यांना मुक्त करीत असे. तो स्त्रियांची अब्रू सांभाळी, त्यांची प्रतिष्ठा राखी. तो गरिबांना पोषी, दुःखितांना शांतवी. कोणी कांहीं मागितले तर त्याने कधीं नाहीं म्हटलें नाहीं. अशा त्या हातिमची मी मुलगी. सुफाना माझें नांव. मला तूं मुक्त नाहीं करणार? माझ्या लोकांस मुक्त नाहीं करणार? तुझ्या उदार हृदयाला मी प्रार्थिते उदार अशा तुझ्या आत्म्याला हांक मारून विनवितें."
पैगंबर म्हणाले, "तुझ्या पित्याच्या अंगीं खऱ्या मुसलमानाचे गुण होते. मूर्तिपूजक असूनहि त्यावर ईश्वराची कृपा व्हावी म्हणून प्रार्थना करण्याची जर मला परवानगी मिळाली तर मी हातिमांच्यासाठी प्रार्थना करीन." नंतर सभोंवतींच्या मुसलमानांस उद्देशून ते म्हणाले, "हातिमांची मुलगी मुक्त आहे. तिचा बाप उदारांचा राणा होता. माणुसकीची मूर्ति होता. जे दयावंत असतात त्यांच्यावर प्रभु प्रेम करतो. ते देवाचे लाडके होतात. ईश्वर त्यांना बक्षीस देतो."
सुफाना मुक्त झाली. सारेच मुक्त करण्यांत आले. मुहंमदांनी सर्वांना देणग्या दिल्या. ते सारे नवधर्म घेते झाले. सुफाना सीरियांत भावाकडे गेली व त्याला मुहंमदांचं औदार्य सांगती झाली. अदीचं हृदय कृतज्ञतेने भरून आलें. तो मदिनेला आला. मुहंमदांच्या चरणीं लागला. इस्लाम स्वीकारता झाला. सुफानाच्या या प्रसंगावर इराणी कविराज सादी याच्या बोस्ताँमध्यें सुंदर कविता आहेत. उदात्त असाच तो प्रसंग होता. जीवनांतील महान् काव्य त्या प्रसंगीं प्रकट झालें होतें.
दुसरी एक मोझेना नांवाची जमात होती. या जमातीचा काब इब्न सुहेर हा प्रसिद्ध कवि होता. हा मुहंमदांचा व नवधर्माचा शत्रु होता. उपहास व टिंगल करी. परंतु त्याचा भाऊ मुस्लिम झाला होता. हा मुस्लिमभाऊ काबला नेहमी
१३० ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१४६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे