Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मदिनेंतील तो चिर असंतुष्ट मुनाफिकीनांचा पक्ष त्यानेंहि असंतोष पसरविण्यास कमी केलें नाहीं. परंतु जे निष्ठावंत होते ते निघाले. त्यांच्यामुळे इतरांसहि स्फूर्ति आली. भ्याडहि झुंजार होऊन उठले. मोहिमेच्या खर्चासाठीं देणग्याहि देऊं लागले. अबुबकर यांनी जवळचें सारें दिलें. उस्मानने स्वतःच्या खर्चाने एक मोठी तुकडी तयार केली. दुसरेहि प्रमुख लोक असें करूं लागले. स्त्रियांनी जडजवाहीर दिले, दागदागिने दिले. "देशासाठी घ्या हें सारें." त्या म्हणाल्या. सैन्य निघाले. बरोबर स्वतः पैगंबर होते. या सैन्याला 'जैश-उल-उस्र' म्हणजे दुःखीकष्टी सैन्य असें नांव आहे. आपद्-ग्रस्त सैन्य! मदिनेचा कारभार पैगंबरांनी अलींवर सोपविला होता. मुहंमदांबरोबर अबदुल्ला इब्न उबय हाहि मुनाफिकीनांसह निघाला होता. परंतु वाटेंतून तो निमूटपणे मदिनेस परत आला. मदिनेत त्याने अशा कंड्या पिकविल्या कीं "पैगंबर पहा कसे आहेत ते. ही मोहीम धोक्याची होती. म्हणून त्यांनी अलींना मात्र बरोबर नेलें नाहीं." अलींना यामुळे वाईट वाटलें. ते सशस्त्र होऊन निघाले व पैगंबरांस गांठते झाले. पैगंबर त्याला म्हणाले, म्हणणारे कांही म्हणोत. तो नीच आरोप आहे. मी तुला खलिफा नेमले आहे. माझ्या ऐवजी नेमले आहे. जा. आपल्या जागी जा. माझ्या व तुझ्या लोकांवर माझा प्रतिनिधि म्हणून रहा. अली मूसाला जसा हारून तसा तूं मला हो. जा." आणि अली परत गेले. आपल्या पाठीमागून अलीनीं खलिफा व्हावें असें पैगंबरांचं मत होतें असें शिया जें म्हणतात ते याच प्रसंगावरून.
 सैन्य जात होतें. मदिना व दमास्कस यांच्या मध्यावर पोचलें होतें. तो कळले की शत्रु येत नाहीं. ते ग्रीकसम्राटांचे केवळ स्वप्न होतें. मुहंमदांनी सैन्यास परतण्याचा हुकूम दिला. तबूक येथे वीस दिवस त्यांनी मुक्काम केला. तेथें दाणा-पाणी भरपूर होते. मुहंमद येतात तो तायफ येथील शिष्टमंडळ आलें. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी पैगंबरांस दगडधोंडे मारून घालविलें होतें. त्यांच्या प्रमुखाचें नांव औरवा. पैगंबरांच्या उपदेशाचा त्याच्या मनावर फार परिणाम झाला होता. हुदैबियाच्या करारानंतर तीन दिवस मुहंमद मक्केंत आले होते त्या वेळेस तायेफ येथील जमातींचा कुरेशांकडे तो वकील होता. तो तायेफमधील लोकांना मूर्तिपूजेविरुद्ध सांगूं लागला. नवीन धर्माचा आशीर्वाद घेण्यास चला म्हणूं लागला. उपाध्यायांनीं व पुजाऱ्यांनी त्याला दगड मारले. आणि तो मरणोन्मुख होऊन पडला.
१२८ ।