Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "विचारा."
 "आम्हां लोकांत ईश्वरानें तुम्हांला पैगंबर म्हणून का पाठवले आहे?"
 "हो. ईश्वराने पाठवले."
 "त्या एका ईश्वराचीच फक्त पूजा करा. त्या एका ईश्वराशीं दुसरें जोडूं नका. पूर्वजांच्या मूर्ति सोडा. असा तुम्ही उपदेश केला का?"
 "हो. अल्लानें असें सांगितले आहे."
 यानंतर प्रार्थना, उपवास, यात्रा वगैरे सर्व गोष्टींविषयीं विचारल्यानंतर तो गृहस्थ म्हणाला, "मीहि तुमच्या धर्माचा होतो. शपथेवर सांगतों कीं, एका अल्लाशिवाय कोणी देव नाहीं. मुहंमद त्याचा पैगंबर आहे. मी सारे नियम पाळीन. जे निषिद्ध आहे ते टाळीन. जे तुम्ही सांगितलेत त्यांतील कांहीं गाळणार नाहीं, कांहीं त्यांत नवीन घालणार नाहीं."
 अशा रीतीनें प्रबळ व सुसंघटित अरब राष्ट्र निर्माण होत होतें. परंतु या वेळेस एक बाहेरचें संकट आले. एके काळी अरबस्थान जिंकुं असें रोमन सम्राट म्हणत असत. आतां बायझंटाईन सम्राट पुन्हां तींच स्वप्ने खेळवूं लागले. पर्शियावर विजय मिळवून हिरॅक्लिअस नुकताच आला होता. मुहंमदांनी वकील पाठविला होता. त्याचा खून झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठीं तीन हजार अरब फौज गेली. परंतु मांडलिक राजाचे कृत्य साम्राज्यसत्तेनें उचलून धरलें. मांडलिकाच्या सैन्यास मिळण्यासाठीं साम्राज्यसेनाहि आली. त्या लढाईत मूठभर अरबांनी बायझंटाईन सैन्य पिटाळून लाविलें होतं. तो अपमान हिरॅक्लिअस विसरला नव्हता. अरबस्थानावर प्रचंड चढायी करण्यासाठी मोठ्या सैन्याची जमवाजमव त्याने चालविली होती. याच वेळेस हिजाज व नज्द भागांत मोठा दुष्काळ पडला. खजुरीचेंहि पीक नव्हतें. गुरेढोरें मरत होती. अशा वेळेस घरें-दारें सोडून लढायीसाठी जावयास लोक तयार नव्हते. लढायीला योग्य अशी वेळहि नव्हती. उन्हाळा फार कडक होता. प्रवासाचे कष्ट फार पडले असते. बायझंटाईन सैन्याविषयहि अतिशयोक्तिपूर्ण गप्पा पसरल्या होत्या. पुष्कळांनी आम्हांस नका नेऊं असें सांगितले. जे अशक्त होते, अधिक दरिद्री होते, ज्यांनी घरदार सोडून जाणें बरें नव्हते त्यांचे अर्ज मंजूर करण्यांत आले. या लोकांना रडणारे 'अल-बक्काऊन' असें नांव पडलें आहे. या वेळेस

इस्लामी संस्कृति । १२७