Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मालमत्ता तेवढी घेण्यांत आली. ती मुसलमानांत वांटली गेली. घोडेस्वारास तीन भाग तर पायदळ शिपायास एक भाग याप्रमाणे सर्वांस भाग दिला गेला. याच वेळेस एका ज्यू स्त्रीनें मुहंमदांस विष चारण्याचा प्रयत्न केला होता. मुहंमदांचा एक अनुयायी मेलाच. परंतु मुहंमद वांचले. त्यांच्या शरीरावर विषाचा परिणाम झाला. या वेळेपासून त्यांची प्रकृति बिघडली. आणि नेहमी त्रास होत असे. मुहंमदांनीं या स्त्रीस क्षमा केली. तिच्या लोकांत तिला सुखरूप राहूं दिलें.

回 回 回





हिजरीचें सातवें वर्ष संपत आले. आदल्या वर्षी ठरल्याप्रमाणें मुहंमद मक्केला जावयास निघाले. या यात्रेला 'उमरतुलकझा'- धन्यतेची यात्रा असें नांव आहे. इ.स. ६२९ चा मार्च महिना होता. पैगंबरांच्या संगें दोन हजार अनुयायी होते. यात्रेचे सर्व विधि ते करणार होते. ही छोटी यात्रा होती. कुरेशांनी एक शब्दहि बोलायचा नाहीं असें ठरविलें होतें. कुरेश तीन दिवस शहर सोडून गेले. आसपासच्या डोंगरांवरून व टेकड्यांवरून ते सारे पहात होते. तो देखावा मोठा अपूर्व होता! जगाच्या इतिहासांतील तें अपूर्व हृदय होते. शहरांतील घरांत कोणी नव्हतें. शहरांतले बाहेर पडत होते व बाहेरचे शहरांत शिरत होते.
१२० ।